ऊस तोडणी कामगारांचा यंदा सोशल डिस्टन्सिंग संसार; कोरोना संसर्गामुळे कारखान्याचा निर्णय

विनायक दरंदले 
Sunday, 18 October 2020

कोरोना संसर्गाचा धोका नको म्हणून साखर कारखाने उस तोडणी कामगारांना एकाच ठिकाणी जास्त कुटुंब राहण्यास परवानगी देत नाहीत.

सोनई (अहमदनगर) : कोरोना संसर्गाचा धोका नको म्हणून साखर कारखाने उस तोडणी कामगारांना एकाच ठिकाणी जास्त कुटुंब राहण्यास परवानगी देत नाहीत. राहण्यात सोशल डिस्टन्सिग ठेवण्याची सूचना असल्याने या कामगारांना वेगळं राहणं महागात पडणार आहे.

मुळा साखर कारखान्याच्या गट परीसरात यापूर्वी एकाच ठिकाणी सातशे ते आठशे कुटुंब राहत होते. या भागाला जणू एका गावाचेच स्वरुप येत होते. यंदाच्या हंगामात येथे कोरोना संसर्गाची काळजी म्हणून एकत्र राहण्यास शेतकी विभागाने परवानगी दिली नाही. पर्यायाने ऊस तोडणी कामगार आता राहण्यासाठी जागा पाहण्याच्या शोधात भटकंती करताना दिसत आहेत.

मुळा गट परिसरात यापुर्वी पाचशे ते सातशे रुपये हंगामाचे भाडे घेवून काही शेतकरी पंधरा बाय पंधरा जागा देत होते. गटातील मोठी जागा यंदा उपलब्ध नसल्याने परीसरात एका कोपीच्या जागेचा भाव तीन ते साडेचार हजार झाला आहे. शिवाय जागा मालकांना रोज दोन ऊसाच्या वाढ्यांचे भेळे व जागेत पडणारं शेणखत द्यावे लागते.

मुळा कारखान्याचे शेतकी अधिकारी विजय फाटके म्हणाले, कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून यंदाच्या वर्षी एकाच ठिकाणी ऊस तोडणी कामगार राहणार नसून त्या- त्या गटात सोशल डिस्टन्सिग ठेवत कामगारांची राहण्याची व्यवस्था केली आहे. 

जालना येथील ऊस तोडणारे कामगार धृपत राठोड म्हणाले, जनावरांना पाणी, आवश्यक सुविधा पाहुन राहण्याची व्यवस्था जास्त जागा भाडे देवून करत आहे. कोरोना संसर्गाचा धोका नको याकरीता कारखान्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. आमच्या कुटुंबाची सुरक्षा कारखाना घेत असल्याने समाधान आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rules of social distance from sugarcane workers to sugarcane workers