लॉकडाउनमध्ये साईसंस्थानचा अनोखा उपक्रम.. जाणून घ्या! 

सतीश वैजापूरकर
Tuesday, 2 June 2020

जनावरे शेतात अथवा जंगलात चरत असताना टाकलेले शेण नंतर उन्हाने वाळले, की त्याची रानशीणी गोवरी तयार होते. मात्र, पावसाळ्यात या गोवऱ्या तयार होत नाहीत. त्यामुळे पावसाळा संपला, की त्या गोळा करण्याचे काम सुरू केले जाते. आठ महिने हे काम चालते.

शिर्डी : साईबाबांनी द्वारकामाईत आपल्या हाताने पेटविलेली धुनी अखंडपणे सुरू आहे. बाबांच्या काळापासून त्यातील उदी भाविकांना प्रसाद म्हणून वितरित केली जाते. लॉकडाऊनच्या काळात त्यासाठी अधिक वेळ मिळाला. त्यात साईसंस्थानने उदीची तब्बल 13 लाख पाकिटे तयार करून ठेवली आहेत. 

हेही वाचा - लोकांना वीजमीटर मिळेना.. इथे रस्त्यावर पडलेत.. 

या धुनीसाठी वर्षाकाठी तब्बल दोन लाख किलो रानशीणी गोवऱ्या लागतात. त्या इतरत्र कुठेही मिळत नाहीत. त्या सातपुड्याच्या पर्वतरांगांतील जंगलात जाऊन तेथील आदिवासी बांधव सलग आठ महिने या गोवऱ्या गोळा करण्याचे काम करतात. त्यानंतर त्या पावसाळ्यापूर्वी येथे आणून त्याचा साठा करून ठेवला जातो. यंदा लॉकडाऊनच्या काळातही खास बाब म्हणून या जंगली गोवऱ्या नंदुरबार जिल्ह्यातून येथे आणण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. 

आठ महिने गोवऱ्या गोळा करण्याचे काम

जनावरे शेतात अथवा जंगलात चरत असताना टाकलेले शेण नंतर उन्हाने वाळले, की त्याची रानशीणी गोवरी तयार होते. मात्र, पावसाळ्यात या गोवऱ्या तयार होत नाहीत. त्यामुळे पावसाळा संपला, की त्या गोळा करण्याचे काम सुरू केले जाते. आठ महिने हे काम चालते. पावसाळ्या संपण्यापूर्वी साईसंस्थानला या गोवऱ्या सुपूर्त केल्या जातात. साईबाबा आपल्या धुनीसाठी या रानशीणी गोवऱ्या व सरपणाचा वापर करीत. ही पद्धत आजही सुरू आहे. 

धुनीची खोली वाढविली

शिर्डीत भाविकांची गर्दी वाढू लागली, तशी धुनीतून तयार होणारी उदी कमी पडू लागली. अधिक उदी मिळावी, यासाठी सरपण व रानशीणी गोवऱ्यांचे प्रमाण वाढविण्यात आले. मात्र, अधिक उष्णतेमुळे द्वारकामाईतील बाबांचे दुर्मिळ चित्र व अन्य वस्तूंना त्याची झळ बसू लागली. त्यामुळे 20 वर्षांपूर्वी या धुनीची खोली वाढविण्यात आली. तिचे नुतनीकरण व मजबुतीकरण करण्यात आले. साईबाबांचे अभ्यासक शरदबाबू (गुरुजी) यांच्या आश्रमातील विदेशी आर्किटेक्‍ट जॉन ख्रिस यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार धुनीसाठी पॅगोड्याच्या आकाराची आकर्षण चिमणी तयार करण्यात आली. त्यानंतर दररोज 40 ते 60 हजार भाविकांना पुरेल एवढी उदी तयार होऊ लागली. 

साईबाबांची उदी औषधी 
धुनीचे नूतनीकरण 20 वर्षांपूर्वी करण्यात आले. साईबाबांचे अभ्यासक (कै.) शरदबाबू, संस्थान अभियंता रघुनाथ आहेर, दूरसंचारचे निवृत्त अभियंता हरिभाऊ गवारे व दाक्षिणात्य भाविकांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्ण केले. रानशीणी गोवऱ्यांची ही साईबाबांची उदी औषधी समजली जाते. 
- सुभाष जगताप, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, साईसंस्थान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sai Sansthan's unique initiative in lockdown