esakal | बनावट आधार कार्ड तयार करुन शिक्षकाच्या प्लॉटची विक्री; २२ लाखाची फसवणूक
sakal

बोलून बातमी शोधा

Sale of teacher plot by making fake Aadhaar card

बनावट अधार कार्ड तयार करून शिक्षकाच्या प्लॉटची कामरगाव व सुपे येथील दोघांना परस्पर विक्री करून सुमारे 22 लाखांना एका टोळीने फसविले आहे.

बनावट आधार कार्ड तयार करुन शिक्षकाच्या प्लॉटची विक्री; २२ लाखाची फसवणूक

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर (अहमदनगर) : बनावट अधार कार्ड तयार करून शिक्षकाच्या प्लॉटची कामरगाव व सुपे येथील दोघांना परस्पर विक्री करून सुमारे 22 लाखांना एका टोळीने फसविले आहे. मूळ मालकासह घेणारे दोघे असे तिघेही हवालदिल झाले आहेत. याबाबत गुन्हा दाखल होताच फसवणूक करणारी टोळी फरार झाली आहे. तालुक्यात अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर दुसऱ्याच्या जमिनी विकणारी टोळी सक्रीय आहे.

सुपे येथे सेवानिवृत्त शिक्षकाचा आडीच गुठे प्लॉट असून तो बाहेरगावी राहातो. याची माहीती या सोनेरी टोळीला मिळाली. या टोळीने मध्यास्थांमार्फत त्या प्लॉटला ग्राहक शोधण्यास सुरूवात केली. प्लॉटच्या साताबारा उताऱ्यावर जे नाव आहे. त्या नावाप्रमाणे बनावट आधारकार्ड तयार करून घेतले. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत प्लॉट विकण्यासाठी प्लॉट मालकाची आई खूप आजारी असून ती पुण्यात दवाखाण्यात आहे. असा बनाव करून मालकाला पैशाची गरज आहे, असे भावनिक अवाहन केले. 

ग्राहकास दोन पैसे कमी द्या पण तातडीने खरेदी करा, असा आग्रह धरला. कमी किंमतीत प्लॉट मिळतो म्हटल्यावर ग्राहक तेथेच फसले. त्यांनी या प्लॉटची खरेदी केली. संबधीत टोळीने बनावट मालक ऊभा करूऩ प्लॉट खरेदी करून दिला. इतकेच नव्हे तर शंका येऊ नये म्हणून बनावट मालकाचा मुलगा म्हणून दुसऱ्याचेही ओळख पत्र तयार करून खरेदीच्या वेळी साक्षीदार म्हणून त्याची सही घेतली. 

वडील व मुलगा दोघेही खरेदी देत आहेत, असा त्यांचा समज झाला. खरेदी होऊन घेणारांच्या नावे पक्की नोंदही झाली. नंतर मात्र खरेदीच्या वेळी दिलेले धनादेश न वटल्याने खरेदीदारांना शंका आली. त्यांनी मालक व मध्यस्थांना फोन लावण्याचा प्रयत्न केला त्यांचे फोन बंद होते. 

मग चौकशीला सुरूवात केली. दुय्यम निबंधक कार्यालयातून मूळ मालकाचे खरेदी खत काढले. त्यावर मालकाचा फोटो व सही सुद्धा वेगळीच अढळून आल्याने घेणारांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी मूळ मालकाचा शोध घेतला. त्यावेळी ही माहीती समजताच मूळ मालकही हबकून गेले.

आम्ही तुमचा प्लॉट परत देतो असे घेणारांनी सांगीतले. मात्र मी विकलाच नाही तर मागे कसा घेणार असा विरोध केला. आम्हाला फसविले आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र मालकाचा विश्वास बसला नाही. फसलेल्या दोघांनी तातडीने पोलिस ठाणे गाठले व फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस त्या सोनेरी टोळीचा शोध घेत आहेत.

या प्रकरणात मध्यस्थ, बोगस आधारकार्ड बनविणारे, दस्तलेखक, साक्षीदार व दुय्यम निबंधक असे सारेच आडचणीत आले आहेत. तालुक्यात बोगस जमिनी खरेदी देणारांची मोठी टोळी असून शोध घेऊन त्यांना चांगला धडा शिकविण्याचे आव्हान पारनेर पोलिसांच्या पुढे आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image