संगमनेर मर्चंट्‌स बॅंकेचा व्याजदराबाबत मोठा निर्णय

आनंद गायकवाड
Saturday, 27 June 2020

संगमनेर मर्चंट बॅंकेच्या कर्जदार ग्राहकांसाठी पूर्वलक्षी प्रभावाने, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे...

संगमनेर ः कोरोनाच्या जागतिक महामारीतील लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवसायांवर विपरित परिणाम झाले आहेत. यामुळे संगमनेर मर्चंट बॅंकेच्या कर्जदार ग्राहकांसाठी पूर्वलक्षी प्रभावाने, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीपासून म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांत कपात करण्यात आली आहे.

बँकेने 2020 - 2021 या वर्षासाठी 0.50 टक्के अतिरिक्त परतावा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष राजेश मालपाणी यांनी दिली. बॅंकेच्या या लोकाभिमुख निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत तज्ज्ञ संचालक सीए संजय राठी यांच्या अभ्यासपूर्ण विवेचनानंतर एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांच्या कालावधीत प्रचंड आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्याने आर्थिक क्षेत्राचा समतोल बिघडला आहे. अनेक व्यवसाय, उद्योगधंदे, अडचणीत आले आहेत. हे सर्व सुरळीत होण्यासही मोठा कालावधी लागेल. छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक व उद्योगधंद्यांना बॅंकेच्या वतीने थोडा आर्थिक दिलासा देण्यासाठी, सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजदरात 0.25 ते 0.50 टक्के कपात करण्याचा व 0.50 टक्के अतिरिक्त रिबेटचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा ः शुभवर्तमान - मुद्रा लोनबाबत सरकारने बँकांना दिला हा आदेश

याबरोबरच बँकेतर्फे 2 कोटींपेक्षा अधिक व्यावसायिक कर्जावर सर्व प्रकारचे रिबेट व व्याजदर कपातीचा फायदा मिळून आता वार्षिक साडेनऊ टक्के इतका कमी व्याजदर लागू होणार आहे. प्रायोरिटी सेक्‍टर अंतर्गत कर्ज पुरवठ्यासाठी किमान नऊ व नॉन प्रायोरिटी सेक्‍टर कर्जासाठी किमान साडेनऊ टक्के व त्यापुढे व्याजदर ठेवण्यात आला आहे. सर्व जुन्या तसेच नव्याने कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना नवीन व्याजदर व रिबेटचा फायदा मिळणार आहे. 

सोनेतारणावर 24 जूनपासून प्रति 10 ग्रॅमवर नऊ टक्के व्याजदराने 35 हजार रुपये मिळणार आहेत. व्यापारी वर्गासाठी सोनेतारणावर 10 लाखांपर्यंतचे कॅशक्रेडीट कर्ज देण्यात येणार आहे. कमी करण्यात आलेल्या लहान व्यावसायिकांसाठी 5 ते 25 लाखांपर्यंतचे लॅप ( लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी ) हा नवीन कर्ज प्रकार रिबेट वजा जाता 10 टक्के व्याजदराने चालू करण्यात आला आहे. 

वाचा ः कर्ज घेता का कर्ज... पतसंस्थांना मिळेना कर्जदार, काय भानगड आहे...

कोरोना प्रादुर्भाव व गर्दी टाळण्यासाठी बॅंकेत न येता 2 लाखांपर्यंतचे व्यवहार मोबाईल बॅंकिंगद्वारा करावेत. नोटा हाताळण्याऐवजी डिजिटल बॅंकिंगचा जास्तीत जास्त वापर सर्वांनी करण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. विविध डिजीटल सुविधा, आधुनिक व ग्राहकाभिमुख तत्पर सेवा यामुळे अनेक नवीन ग्राहक बॅंकेशी जोडले जात असल्याचे समाधान मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सुरम यांनी व्यक्त केले आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangamner Merchants Bank's big decision about interest rate