दरोड्याच्या तयारीतील तीन आरोपींना पकडले; गुंजाळवाडीत कारवाई

आनंद गायकवाड
Thursday, 7 January 2021

पोलिस घटनास्थळी जाताना पाच जणांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले. अंधाराचा फायदा घेऊन दोघे पळाले.

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील गुंजाळवाडी शिवारात नाशिक-पुणे बाह्यवळण राष्ट्रीय महामार्गालगतच्या बोगद्यात दरोड्याच्या तयारीत बसलेल्या तिघांना शहर पोलिसांनी पाठलाग करून बुधवारी पहाटे पकडले. कारवाईदरम्यान दोघे पसार झाले.
 
असिफ अन्सार पठाण (वय 31), तन्वीर कादीर शेख (वय 36) व भूषण बंडू थोरात (वय 29, रा.घुलेवाडी, ता.संगमनेर) यांना पकडले, तर अमोल जोंधळे (रा. गुंजाळवाडी) व बबलू ऊर्फ फिटर (रा. संगमनेर) हे पसार झाले. गुंजाळवाडी शिवारात एका मोटारीत काही तरुण बसले असून, वाहनांची लूट करीत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळाली. 

त्यानुसार, पोलिस घटनास्थळी जाताना पाच जणांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले. अंधाराचा फायदा घेऊन दोघे पळाले. पोलिसांनी सुमारे साडेआठ लाख रुपये किंमतीची मोटार (एमएच 12 एमएफ 3684), 30 हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल, स्क्रू, हातोडा, मिरची पावडर, दोरी, लोखंडी छन्नी, असे सुमारे 8 लाख 80 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In sangamner taluka the city police chased and arrested three persons who were preparing for a robbery on wednesday morning