कोरोनामुळे संत निळोबाराय महाराज यात्रा, उत्सव रद्द; खेळणी विक्रेत्यांसह व्यावसायिकांना आर्थिक फटका

Sant Nilobarai Maharaj Yatra has been cancelled.jpg
Sant Nilobarai Maharaj Yatra has been cancelled.jpg

राळेगणसिद्धी (अहमदनगर) : कोरोना संसर्गजन्य विषाणूचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव वाढू लागल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही गावोगावी सुरू होणाऱ्या यात्रा, उत्सव, उरुसावर बंदी आली आहे. कोरोना संसर्गजन्य आजाराचा संभाव्य धोका ओळखत प्रशासनाने गावोगावी सुरु होणाऱ्या यात्रा, उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम सध्या रद्द केले जात आहेत. त्यामुळे यात्रांच्या हंगामात धार्मिक पूजेचे साहित्य, खेळणी, गृहउपयोगी वस्तू, कपडे, बांगड्या, मिठाई, खाद्यपदार्थ आदी वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
 
पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या 268 व्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवस मोठा यात्रोत्सव असतो. पिंपळनेरसह पारनेर, शिरूर, श्रीगोंदा, नगर आदी तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. यात्रेनिमित्त छोट्या मोठ्या विक्रेत्यांची लाखो रुपयांची उलाढाल होत असते. 

मागील वर्षी ऐन यात्रांच्या हंगामातच कोरोनाचे संकट उभे राहिल्यामुळे सर्वत्रच यात्रा, उरूस, उत्सवांवर शासनाने बंदी घातली होती. त्याचा फटका छोट्या मोठ्या विक्रेत्यांना बसला असून आजही त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
 
दरम्यान मागील वर्षी दिवाळीनंतर कोरोनाचे संकट कमी झाल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत होती. त्यामुळे यावर्षी यात्रा, उत्सव तसेच धार्मिक उत्सव पूर्वीप्रमाणे भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु गेल्या एक दीड महिन्यापासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने डोकेवर काढल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही यात्रा, उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रमावर निर्बंध येऊ लागले आहेत. परिणामी कोरोनाच्या दुबार संकटामुळे यात्रेतील व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षी शासनाने यात्रांवर निर्बंध आणल्याने भविष्यातील उदरनिर्वाह व आर्थिक नियोजन कसे करायचे या विवंचनेत सध्या हे विक्रेते आहेत.

यात्रा हंगामातील या चार महिन्याच्या कालावधीत आमचे एकूण वर्षाचे उत्पन्न होत असते. म्हणून हा यात्रांचा हंगाम आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे सर्वच गणित बिघडले आहे.
- प्रभाकर शिंदे, पेढे व्यावसायिक

तुळजापूरहून यात्रेनिमित्त माझे दुकान घेऊन आलो होतो. मात्र इथे आल्यावर समजले की आता यात्रा नाही. आता जाण्या येण्या इतपत जरी पैसे मिळाले तरी खूप होईल.
- प्रदिप कासार, प्रसाद व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com