esakal | श्रीगोंद्याच्या घनकचरा व्यवस्थापनात घोटाळा, संभाजी ब्रिगेडची तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Scandal in Shrigonda's solid waste management

सार्वजनिक शौचालय रोजच्या रोज सफाई केलेले दर्शवले आहे. परंतु प्रत्यक्ष असे नसून सार्वजनिक शौचालय धुतलेच जात नाही तरीही बिल काढले जाते.

श्रीगोंद्याच्या घनकचरा व्यवस्थापनात घोटाळा, संभाजी ब्रिगेडची तक्रार

sakal_logo
By
संजय आ. काटे

श्रीगोंदे : श्रीगोंदे नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनात मोठी अनियमितता आहे. या कामाच्या ठेक्याची रक्कम गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट वाढवली आहे. दर महिन्याला घन कचऱ्याचे बेकायदा बिले काढण्यात येत आहे. संभाजी ब्रिगेडने या बाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. 

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश बोरुडे यांनी सांगितले, की चालू आर्थिक वर्षात घनकचरा व्यवस्थापयानुसार शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला सुका वर्गीकरणानुसार संकलन करून वाहतूक करणे या कामाकरिता ई बी एनव्हायरो बायोटेक प्रा. लि. नाशिक यांची नेमणूक केली आहे.

ठेकेदाराने प्रत्येक फेरीत संकलीत केलेल्या कचऱ्याचे वजन करणे करारानुसार बंधनकारक आहे. परंतु ठेकेदार काही दिवसाचेच असे वजन करून बाकीच्या दिवसाचे सरासरी वजन बेकायदा पद्धतीने गृहीत धरून पालिकाही बिले अदा करीत आहे. 

शहरातील कचरा संकलन करताना कचरा ओला व सुका गोळा करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना घंटागाडीध्ये सर्व कचरा हा वेगळा न करता एकत्र भरला जातो. लॉकडाऊनमध्ये व्यापारी बाजारपेठा बंद होत्या तरीसुद्धा बंदच्या काळातले कचऱ्याचे वजन हे बाजारपेठ चालू असतानापेक्षा जास्त दाखविले आहे.

कचरा वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनावर (घंटा गाडीवर) जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक असतानासुध्दा जाणीवपूर्वक ती यंत्रणा बसवली नाही. घनकचरा ठेकेदाराने सादर केलेल्या बिलानुसार प्रत्येक महिन्याला 30 किंवा 31 असे मृत जनावरे उचल्याचे दर्शवले आहे. या बाबत कुठले जनावर उचलले या बाबत लेखी तपशील उपलब्ध नाही.

सार्वजनिक शौचालय रोजच्या रोज सफाई केलेले दर्शवले आहे. परंतु प्रत्यक्ष असे नसून सार्वजनिक शौचालय धुतलेच जात नाही तरीही बिल काढले जाते.

घनकचरा ठेकेदाराला पदाधिकारी व प्रशासनाचा आशीर्वाद असल्याने मोठ्या प्रमाणात जनतेच्या पैशाची लूट होत आहे. स्वच्छ भारत अभियान कमिटी येणार असेल तरच पालिका ऍक्टिव्ह होते एरव्ही मात्र लक्ष नसते. या संदर्भात संभाजी ब्रिगेडने सदर ठेका रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर