कर्जदारांनी कर्जापोटी दिलेली रक्कम संस्थेत जमा न करता दडपली; नगर जिल्ह्यात सचिव निलंबीत 

संजय आ. काटे
Saturday, 7 November 2020

कोरेगव्हाण सेवा संस्थेचे तत्कालीन सचिव संदीप मापारे यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समिती सचिव सुदाम रोकडे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.

श्रीगोंदे (अहमदनगर) : कोरेगव्हाण सेवा संस्थेचे तत्कालीन सचिव संदीप मापारे यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समिती सचिव सुदाम रोकडे यांनी याबाबतचा आदेश दिला आहे. कर्जदारांनी कर्जापोटी दिलेली रक्कम संस्थेत जमा करता दडपल्याचा आरोप आहे. 

निलंबित सचिव मापारे यांनी कोरेगव्हाण सेवा संस्थेत असताना सभासदांनी कर्जापोटी संस्थेत जमा करण्यासाठी दिलेली वारंवार दिलेली जवळपास तेरा लाखांची रक्कम संस्थेच्या खतावणीस जमा दाखविली मात्र त्याच्या पावत्या न करता सदर रक्कम प्रत्यक्षात स्वतःकडे ठेवली. हा विषय लेखापरीक्षण अहवालात पुढे आला.

लेखापरीक्षकांनी तसे शेरे मारले. सदर रक्कम नंतर मापारे यांच्याकडून वसूल करण्यात आली. मात्र मापारे यांच्यावर कारवाई होत नसल्याने जितेंद्र आढाव यांनी तक्रार केली. येथील सहायक निंबधक रावसाहेब खेडकर यांनी व्याजही वसूल केले. मापारे यांना निलंबित करून खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश झाले.

सचिव मापारे यांनी सभासदांनी कर्जापोटी दिलेली रक्कम प्रत्यक्षात जमा केली नव्हती. लेखापरीक्षण अहवालात हा मुद्दा पुढे आला. दडवलेली सगळी रक्कम व्याजासह वसूल केली आहे. आता त्यांचे निलंबन झाल्याने चौकशी होईल. 
- रावसाहेब खेडकर, सहायक निबंधक श्रीगोंदे 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Secretary of Koregavhan Seva Sanstha in Shrigonda taluka suspended