
रायतळे हे सुप्यापासून सहा किलोमीटरवर असलेले अतिशय छोटे, सुमारे बाराशे लोकवस्तीचे गाव एका टेकडीच्या पायथ्याला वसलेले आहे. काही वस्ती टेकडीवर व काही शेतात, अशी विखुरलेली आहे. इथे तरुणांनी असे काही केले की...
पारनेर ः रायतळे येथील तरुणांनी लॉकडाउनच्या काळात लोकवर्गणीतून सुमारे दोन लाख रुपये खर्च करून खुली व्यायामशाळा (ओपन जिम) उभी केली आहे. पाच वर्षांपासून थेट वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी खुल्या असलेल्या या व्यायामशाळेचे उद्घाटनही बालगोपाळांच्या हस्तेच करण्यात आले. या "ओपन जिम'चा रोज किमान दोनशेहून अधिक आबालवृद्ध लाभ घेत आहेत.
रायतळे हे सुप्यापासून सहा किलोमीटरवर असलेले अतिशय छोटे, सुमारे बाराशे लोकवस्तीचे गाव एका टेकडीच्या पायथ्याला वसलेले आहे. काही वस्ती टेकडीवर व काही शेतात, अशी विखुरलेली आहे. गावाचा परिसर अतिशय सुंदर आहे. गावात विरंगुळ्याचे वा मनोरंजनाचे कोणतेही साधन नाही. सुमारे तीन महिन्यांपासून लॉकडाउनमुळे कामधंदा, नोकरीच्या निमित्ताने शहरात गेलेले अनेक तरुण गावात आहेत. या काळात घरात बसून लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण कंटाळले आहेत. मोठ्यांसह लहान मुलेही मोबाईलच्या आहारी जात असल्याचे घरातील सर्वांनाच खटकत आहे. लहान-थोरांच्या हातात सतत मोबाईल दिसू लागला.
यावर उपाय म्हणून अमित साबळे, राजू येणारे, मंगेश चितळकर व संभाजी मेमाणे यांनी गावातील तरुण, वयस्कर, तसेच मुलांसाठी गावालगत असलेल्या मोकळ्या जागेत "ओपन जिम' उभारण्याचा मानस व्यक्त केला. ही कल्पना सर्वांनाच आवडली. परिणाम म्हणून अवघ्या एका महिन्यात लोकवर्गणीतून सुमारे दोन लाख रुपये जमले. त्यातून ग्रामस्थांच्या सहकार्याने "ओपन जिम' उभी केली. आता या ठिकाणी एकाच वेळी किमान 25 मुले-मुली व्यायाम करू शकतात.
या मैदानात व्हॉलिबॉलसह सिंगल बार, डबल बार, क्लाइंबिंग रोपपासून तर सायकलिंग, एअर वॉकर्स, चेस्ट प्रेस आदी साहित्याचा समावेश केला आहे. हे सर्व साहित्य त्यांनी आपल्या देखरेखीखाली अतिशय दणकट असे बनवून घेतले आहे. भविष्यात येथे एक छोटी बाग, तसेच छोट्या मुलांसाठी खेळणीसुद्धा उभारण्याचा मानस राजू येणारे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा ः अंगणवाडी ताईची मुलगी झाली डीवायएसपी
लहान मुलांच्या हस्ते उद्घाटन
तालुक्यातील या आदर्श व पथदर्शी ओपन जिमचे नुकतेच उद्घाटन झाले. कोणा राजकीय नेत्याला न बोलावता गावातील शालेय मुली व मुलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिमच्या उभारणीस सर्व ग्रामस्थांचे, तसेच तरुणांचे मोठे सहकार्य लाभल्याचे अमित साबळे यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.