नातवावर हल्ला चढवणाऱ्या बिबट्याला आजीबाईंनी काठीने बडवल्यावर ठोकली धूम

राजेंद्र सावंत
Sunday, 8 November 2020

मोहरी येथील चिरदरा परिसरातील डोंगराच्या कडेला असलेल्या बन वस्तीवर आज सायंकाळी सहा वाजता चंद्रभागा बन दारात बसल्या होत्या.

पाथर्डी : तालुक्‍यातील मोहरी येथील बन वस्तीवर आज सायंकाळी आजीजवळ खेळणाऱ्या तीन वर्षीय चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला चढविला. मात्र, प्रसंगावधान राखत धाडसी आजीने आपल्या काठीचा प्रसाद देत, बिबट्यावर प्रतिहल्ला चढविला.

आजीची रुद्रावतार पाहून बिबट्याने माघार घेत तेथून धूम ठोकली. त्यामुळे चिमुकला बालंबाल बचावला. चंद्रभागा बन (वय 80) असे या धाडसी आजीचे, तर रूद्र सुनील बन (वय 3) असे तिच्या नातवाचे नाव आहे. 

मोहरी येथील चिरदरा परिसरातील डोंगराच्या कडेला असलेल्या बन वस्तीवर आज सायंकाळी सहा वाजता चंद्रभागा बन दारात बसल्या होत्या. त्याच्याजवळच नातू रूद्र खेळत होता. घराच्या भिंतीआड बिबट्या दबा धरून बसला होता.

संधी साधून त्याने रुद्रवर झेप घेतली. थोडा वेळ गोंधळलेल्या आजी चंद्रभागा यांच्यातील रणचंडीका जागी झाली. त्यांनी हातातील काठीने बिबट्यावरच प्रतिहल्ला चढविला. त्यामुळे बिबट्या गांगरला. आरडाओरडा झाल्याने शेजारी मदतीसाठी धावले आणि बिबट्याने तेथून धूम ठोकली. 

दरम्यान, रुद्रच्या शोधात बिबट्या पुन्हा घरामागे जाऊन थांबला होता. मात्र, ही बाब लक्षात येताच, काठ्या-कुऱ्हाडी घेऊन लोक त्याच्यामागे धावले. अखेर बिबट्याने तेथून पळ काढला. याबाबत माहिती समजताच, सहायक उपवनसंरक्षक बी. बी. पाटील, वन अधिकारी शिरीष निरभणे, विवेक देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली.

परिसरात बिबट्याचा शोध सुरू होता. रात्री उशिरापर्यंत बिबट्याची शोधमोहीम सुरू होती. दोन दिवसांपूर्वी बिबट्या व त्याच्या बछड्यांची ठसे आढळून आल्याने परिसरात पिंजरा लावला आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seeing the grandmother, the leopard ran away