शेवगाव तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता गेला वाहुन

सचिन सातपुते 
Wednesday, 21 October 2020

पावसाचे पाणी वाहिल्याने शेवगाव दहिफळ खानापूर हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता खुंटेफळ जवळ अक्षरश: वाहून गेला असून रस्त्यावर पडलेल्या मोठया भगदाडामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

शेवगाव (अहमदनगर) : पावसाचे पाणी वाहिल्याने शेवगाव दहिफळ खानापूर हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता खुंटेफळ जवळ अक्षरश: वाहून गेला असून रस्त्यावर पडलेल्या मोठया भगदाडामुळे वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे जायकवाडी धरण परिसरातील रहिवाशी नागरीकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

शेवगावहून खुंटेफळ, ताजनापूर, बोडखे, दहिफळ, एरंडगाव व खानापूर या जायकवाडी धरण फुगवटयाकाठच्या गावांना जोडणारा हा पक्का रस्ता 2009 साली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झाला. त्यामुळे या गावातील नागरीकांची मोठया प्रमाणावर सोय झाली. गेल्या काही दिवसापासून तालुक्यात मोठया प्रमाणावर पाऊस सुरु असून त्यामुळे अनेक रस्त्यांची वाताहात झाली आहे. या रस्त्यावरील खुंटेफळ गावाशेजारील स्मशानभुमीजवळ पावसाचे पाणी या रस्त्यावरुन वाहिल्याने एका बाजूने पंधरा ते वीस फुट लांबीचे मोठे भगदाड पडले आहे.

त्याची खोली जवळपास 8 ते 10 फुट असून रस्त्याच्या एका बाजूने त्याचा अंदाज येत नाही. या रस्त्यावरुन रात्री अपरात्री नागरीकांची येजा सुरु असते. समोरुन येणा-या वाहनांचा लाईटमुळे या खड्डयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनासहीत त्यात अनेक जण पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मोठ्या चारचाकी व अवजड वाहनांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक असून त्यामुळे मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. 

या परिसरात ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने कारखान्यांच्या चालू हंगामासाठी ऊसाची वाहतुक याच रस्त्याने सुरु होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतक-यांनी व ग्रामस्थांनी संबंधीत विभागाच्या ही बाब काही दिवसापूर्वी निदर्शनास आणून दिली आहे. मात्र अदयापही याबाबत उपाय योजना करण्यात आलेली नाही. नागरीकांची मात्र जीव मुठीत धरुन वाहतुक सुरु आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी महेश काळे, गणेश पागर, सचिन काळे, गौतम सुपारे, सोपान आधाट, महेश मोरे, संतोष शेळके, सोपान काळे, बंटी कापसे आदींनी केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shevgaon taluka the road under Pradhan Mantri Gramsadak Yojana was taken away