Ramdas Athawale : उद्धव ठाकरे यांनी भाजपशी पुन्हा युती करावी shirdi ramdas athawale uddhav thackeray bjp Alliance politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athawale

Ramdas Athawale : उद्धव ठाकरे यांनी भाजपशी पुन्हा युती करावी

शिर्डी - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मनमिळाऊ व शांत स्वभावाचे आहेत. ते माझे मित्रदेखील आहेत. मात्र, त्यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची चूक केली. त्यांच्या आमदारांचा महाविकास आघाडीत जाण्यास विरोध होता. अद्यापही वेळ गेलेली नाही. त्यांनी भाजपशी पुन्हा युती करावी, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज (शनिवारी) पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री अविनाश महातेकर, प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, अॅड. बी. के. बर्वे, नागालॅंडचे आमदार एलिमा वन चांग, लिमटिचाबा चांग, प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकचौरे, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, बाळासाहेब गायकवाड, युवक आघाडीचे अध्यक्ष पप्पू बनसोडे, राज्य सचिव दीपक गायकवाड, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, कैलास शेजवळ, सुनील मोरे, नाना त्रिभुवन आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याबाबत आपली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली. गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. संधी मिळाल्यास निवडणूक लढवू आणि मंत्री असल्याने शिर्डी परिसराचादेखील विकास करू.’

जातीनिहाय जनगणना करावी, असा ठराव आज कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. जनगणना आयोगाशीही मी बोलणार आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यास समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना पोचण्यास मदतच मिळेल. दलित भूमिहीनांना सरकारने पाच एकर जमीन द्यावी, खासगी क्षेत्रात बढतीत आरक्षण मिळावे आदी ठरावदेखील मंजूर करण्यात आले.

- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री.