अकलापूरमधील श्री दत्त मंदिर भाविकांसाठी खुले; गुरुवार असल्याने होणार गर्दी

शांताराम जाधव
Thursday, 19 November 2020

कोरोना काळातील आठ महिने बंद असलेले पठारभागातील अकलापूर येथील श्री दत्त मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.

बोटा (अहमदनगर) : कोरोना काळातील आठ महिने बंद असलेले पठारभागातील अकलापूर येथील श्री दत्त मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. शासनाच्या निर्णयाचे देवस्थानचे विश्वस्त यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे.

अकलापूर येथे दत्त महाराजांचे भव्य मंदिर आहे. वर्षभरातील गुरूपोर्णिमा, दत्त जयंतीच्या निमित्तानं पुणे, नाशिक, मुंबई येथून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यावेळी संपूर्ण परिसर दत्त महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून जातो. आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी दत्त महाराजांच्या आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय आदेशानुसार सलग आठ महिने मंदिर बंद होते. त्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह अशा धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्याने दत्त महाराजांच्या दर्शनासाठी भाविक व्याकुळ झाले होते.

नागरिकांच्या धार्मिक भावनांचा विचार करून शासनाच्या निर्णयानुसार अखेर सोमवार पासून राज्यातील सर्व मंदिर खुली करण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भाविकांनी फटाके वाजवत आनंद व्यक्त केला. अकलापूर देवस्थानचे पुजारी नारायण कणसे, वेदांतगिरी महाराज यांनीही पुजा केली. त्यानंतर विश्वस्त नामदेव गायकवाड, संपतराव आभाळे, दिनकर आभाळे, रामदास दिवेकर, ठका आभाळे, लहु आभाळे, राजू राऊत, दत्तात्रय आभाळे, मंगेश शिंदे यांनी फटाके वाजून आनंद व्यक्त केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Dutt Temple in Akalapur is open for devotees