सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचा कोरोनाने लावला दरवाजा, परिसराचे हरपले चैतन्य

दत्ता उकिरडे
Saturday, 29 August 2020

ना प्रसादाची दुकाने, ना अल्पोपहाराचे स्टॉल.. ना गरमागरम चहाची टपरी.. कांदाभजी, नारळाचं शहाळं, भाजलेली मक्‍याची कणसं, उसाचा रसाच्या मशीनचा आवाज कुठेच दिसत नाही. दिसते ती फक्त स्मशान शांतता. सिद्धीविनायकाच्या मुख्य दरवाजाला कुलूप लागलंय.

राशीन : कोरोनामुळे गणेशोत्सवातही अष्टविनायकाची सर्वच मंदिरे बंद आहेत. त्यामुळे तेथील चैतन्य हरवले आहे. गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे. 

अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धटेक (ता. कर्जत) येथील सिद्धिविनायकाचे मंदिरही त्यास अपवाद नाही. मंदिर परिसरातील वर्दळ, चैतन्यदायी वातावरण यंदा कुठेच दिसत नाही. आहे ती फक्त, सर्वत्र धीरगंभीर शांतता, सामसूम. दुर्वांचा हार घ्या ना.., म्हणत भाविकांना विनवणाऱ्या मुली.. कपाळी गोपीचंदनाचा टिळा लावणारा बाबा सध्या कुठेच दिसत नाहीत. 

हेही वाचा - दार उघड उद्धवा आता दार उघड

ना प्रसादाची दुकाने, ना अल्पोपहाराचे स्टॉल.. ना गरमागरम चहाची टपरी.. कांदाभजी, नारळाचं शहाळं, भाजलेली मक्‍याची कणसं, उसाचा रसाच्या मशीनचा आवाज कुठेच दिसत नाही. दिसते ती फक्त स्मशान शांतता. सिद्धीविनायकाच्या मुख्य दरवाजाला कुलूप लागलंय. भीमा नदी संथ वाहते आहे.

तेथेही बोटिंगचा आनंद लुटणारे पर्यटक दिसत नाहीत. नदीच्या पुलावर दर्शनाला आलेली जोडपी आवडीने सेल्फी घेतात. तेथेच पालातील खमंग जेवणाचा आस्वाद घेणारे मुंबई-पुणेकर गायब झालेत. गजबजलेला भीमा नदीचा किनारा ओस पडला आहे.

सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेचे व्यवसाय करणाऱ्या शेकडो कुटुंबांची भाजीभाकरी कोरोनाने हिरावली. देऊळबंदचा निर्णय महामारीतून वाचण्यासाठीच असल्याने हातावरची पोट असणाऱ्यांनी तो स्वीकारला आहे. गणेशोत्सवाच्या नयनरम्य सोहळ्याला यंदा भाविक मुकले असले, तरी प्रत्येक घरातून कोरोनाचे संकट हटू दे, असे साकडे गणेशाला घातले जात आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhivinayaka's temple of Siddhatek closed