तर त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई - महापौर वाकळे 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 June 2020

महापालिकेची बदनामी होत असेल तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी लागेल. या संदर्भात उद्या (सोमवारी) महापालिकेत नगरसेवक, पदाधिकारी व भाजप शहर जिल्हाध्यक्ष यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

नगर : महापालिकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होत आहे. या प्रकरणामुळे महापालिकेची बदनामी होत असेल तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी लागेल. या संदर्भात उद्या (सोमवारी) महापालिकेत नगरसेवक, पदाधिकारी व भाजप शहर जिल्हाध्यक्ष यांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. 

महापालिकेला स्वच्छतेबाबत थ्री स्टार मिळाल्याबद्दल भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महेंद्र गंधे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, संजय ढोणे आदी उपस्थित होते. 

वाकळे म्हणाले, शहराला फाईव्ह स्टार करणे हे आमचे आगामी धेय्य आहे. थ्री स्टार संदर्भात केंद्राकडून मिळणाऱ्या बक्षिसातून शहरातील रस्ते स्वच्छ करण्यासाठी 5 कोटी रुपयांचे स्वयंचलित मशीन खरेदी करणार आहोत तसेच शहरातील शौचालयांतील त्रूटी पूर्ण करण्यासाठी या निधीचा प्रामुख्याने वापर करण्यात येईल. शहरातील स्वच्छतेमुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पा संदर्भात दोन दिवसांनंतर निर्णय घेण्यात येईल. या सभेत कोणत्याही निवड प्रक्रियेचा विषय होणार नाही. 

गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्ना प्रमाणे काम करत महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शहर कचराकुंडी मुक्‍त केले आहे. गंधे यांनी स्वच्छतेचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: So strict action against those officers - Mayor Wakle