सोनईत 'ताई...माई...अक्का' चा गजर सुरु; उमेदवारांचा भेटीगाठीवर जोर

विनायक दरंदले
Saturday, 9 January 2021

गल्ली आणि वाड्यावस्त्यांवर ध्वनीक्षेपकांच्या वाहनांची वर्दळ सुरु झाली आहे.

सोनई (अहमदनगर) : सोनईत दोन्ही गटाचे प्रचार नारळ फुटल्यानंतर लगेचच गल्लोगल्लीत ध्वनीक्षेपकावर 'ताई..माई..अक्का विचार करा पक्का'चा गजर सुरु झाला आहे.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाच्या जगदंब मंडळाचे नेतृत्व अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख व उदयन गडाख करत आहेत. तर माजी खासदार तुकाराम गडाख यांच्या मार्गदर्शनाखालील ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व प्रकाश शेटे करत आहेत. दोन्ही गटाने श्री गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात केली आहे.

गल्ली आणि वाड्यावस्त्यांवर ध्वनीक्षेपकांच्या वाहनांची वर्दळ सुरु झाली आहे. अश्वासनाबरोबरच आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. माझी खासदार गडाखांच्या सहभागाने सुरुवातीला लढत रंगतदार होईल, असे वाटत होते. मात्र सध्या तरी जगदंब मंडळाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

फंडा पाया पडण्याचा

सोनई ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरु लागला आहे. मतदाराची कृपाच विजय मिळवून देणार असल्याने दोन्ही गटाच्या उमेदवारात मतदारांच्या पाया पडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In sonai the alarm of tai mai akka vichar kara pakka has started on the loudspeaker in area