केंद्रामुळे शेतकरी उद्ध्वस्त

राज्यमंत्री बच्चू कडू यांची सरकारवर टीका
bachhu kadu
bachhu kadusakal

श्रीरामपूर - केंद्राच्या आयात-निर्यात धोरणांमुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. जीवनाची लढाई मागे पडली आहे. जाती-धर्माच्या लढाया मोठ्या झाल्या आहेत, अशी घणाघाती टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे केली. श्रीरामपूरला न्यायालयीन कामकाजासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अभिजित पोटे, आप्पासाहेब ढूस, विवेक माटा, बाळासाहेब पटारे, अहमद जहागीरदार, लकी सेठी आदी उपस्थित होते.

शेतमालाला हमीभाव देता येत नसेल तर ''पेरणी ते कापणी योजना'' रोजगार हमी योजनेला जोडण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनात याची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगून कांद्याच्या भावासंदर्भात ते म्हणाले, कांदा खरेदी संदर्भात केंद्राची भूमिका गुलदस्त्यात आहे. तूर, सोयाबीन खरेदीसाठी ज्याप्रमाणे फेडरेशन समोर येते. त्या धर्तीवर नाफेडने कांदा खरेदीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला तर चांगले परिणाम दिसतील. तेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले. देशात तुरीचे ४८ लाख क्विंटल उत्पादन झाले. ४६ लाख टन देशाला लागते, असे असताना १० लाख टन तूर आयात करून कोणाचे पोट भरायचे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

कच्चे तेल आयात करून. त्याच्यावर अदानी, अंबानीच्या फॅक्टऱ्यांमध्ये प्रक्रिया केली. त्याचा नफा त्यांना देऊन मग लोकांना देत असाल तर कोणाचे हित साध्य झाले. कुठे आहे तुमचा ''मेक इन इंडिया'', ''मेड इन इंडिया'', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. ''गो-बॅक कंपनी, वेलकम शेतकरी'' या योजनेंतर्गत देशातील पहिला बियाणे महोत्सव आपल्या जिल्ह्यात घेणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ४ लाख क्विंटल बियाणे साठवले आहे. त्यामुळे खरिपाच्या बियाण्यांसाठी कंपन्यांकडे जाण्याची गरज नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

भोंगा, हनुमान चालिसावरून टीकास्त्र

भोंगा, हनुमान चालिसा, मंदिर, मस्जिद आणि ईडीसोडून केंद्राचा काही कार्यक्रम दिसत नाही. स्वतःला वाजवत येत नाही तर दुसऱ्याला वाजवायला लावायचे. हनुमान चालीसा आपल्याला म्हणता येत नाही तर दुसऱ्याला म्हणायला लावायचे, अशी टीका मंत्री बच्चू कडू यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com