चोरांचा बंदोबस्त करा अन्यथा; राहुरीत चोऱ्यांमुळे व्यापारी त्रस्त

विलास कुलकर्णी
Monday, 23 November 2020

वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत असलेले व्यापारी चोरांच्या उपद्रवामुळे हवालदिल झाले आहेत.

राहुरी (अहमदनगर) : शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत असलेले व्यापारी चोरांच्या उपद्रवामुळे हवालदिल झाले आहेत. चोरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा, राहुरीतील व्यापाऱ्यांतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल." असा इशारा राहुरी तालुका व्यापारी असोसिएशनतर्फे देण्यात आला.

सोमवारी पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना निवेदन देण्यात आले. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, अनिल कासार, विलास तरवडे, कांता तनपुरे, प्रवीण दरक यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले की, "शुक्रवारी (ता. 20) रात्री बालाजी मंदिरासमोर नगर-मनमाड रस्त्यानजीक अशोक लालबागे यांचे शेती औजारे व दुरुस्तीचे दुकान फुटले. त्यात, 45 हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला. त्याच रात्री राहुरी स्टेशन रस्त्यावरील नव्याने सुरू झालेले 'वश्याट बाजार' हे दुकान चोरट्यांनी फोडले."

"शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या संकटात व्यापारी पेठ बंद राहिली. व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान झाले. आता चोरट्यांच्या उपद्रवामुळे व्यापारी हवालदिल झाले आहेत. राहुरी पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. अन्यथा आंदोलन छेडले जाईल." असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement of Rahuri Merchant Association to Police Inspector