मावशीच्या गावात साकारणार गोपीनाथ मुंडेंचा पुतळा, प्रत्येक गावातून जाणार एक वीट

राजेंद्र सावंत
Tuesday, 25 August 2020

लोकांच्या वर्गणीतुन पुतळा उभारला जाईल. एका गावातून एक वीट पुतळ्याच्या चौथा-यासाठी जमा करण्यात येणार आहे. समितीचे पदाधिकारी हे सर्व जाती-धर्माचे असतील व यामधे राजकीय विषय नसेल.

पाथर्डी ः तालुक्यातील प्रत्येक गावातील एक वीट व लोकवर्गणीतून पुतळा नगरपालिकेच्या जॉगिंग पार्कमध्ये लोकनेते स्वर्गीय गोपिनाथ मुंडे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. सामान्य माणसाला हा पुतळा आपला वाटावा व प्रेरणा मिळावी यासाठी ही संकल्पना राबवली जात आहे. 

स्वर्गीय राजीव राजळेंची ही संकल्पना प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे आपल्या कलेतून पुर्णत्वाला नेणार आहेत. सोमवारी येथील आप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहात तालुक्यातील गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणा-या कार्यकर्त्यांची बैठक झाली. मुंडे यांचा पुतळा उभारण्यासाठी समिती स्थापन करण्याचा व समितीच्या अध्यक्षपदी आमदार मोनिका राजळे यांची निवड करण्य़ाचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीनंतर पत्रकार परीषदेत बोलताना राजळे म्हणाल्या, स्वर्गीय गोपिनाथ मुंडे हे आपले सर्वांचे दैवत आहे. मुंडे यांनी केलेला संघर्ष आणि लोकांच्या कल्याणाची तळमळ सर्वश्रुत आहे. त्यांचे कार्य अलौकीक आहे. पाथर्डीत नगरपालिकेने उभारलेल्या जाँगींग पार्कमधे लोकनेते गोपिनाथ मुंडे यांचा बारा फुटी चौथा-यावर बारा फुटाचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. त्यासाठी सामान्य माणसाच्या कष्टाचा एक रुपया आमच्यासाठी लाख मोलाचा असेल.

हेही वाचा - मोठी बातमी ः खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह फॅमिलीला कोरोना

लोकांच्या वर्गणीतुन पुतळा उभारला जाईल. एका गावातून एक वीट पुतळ्याच्या चौथा-यासाठी जमा करण्यात येणार आहे. समितीचे पदाधिकारी हे सर्व जाती-धर्माचे असतील व यामधे राजकीय विषय नसेल. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पुतळा लोकार्पणाचा कार्यक्रम घेण्यात येईल. 

शिल्पकार प्रमोद कांबळे हे मुंडे यांचा पुतळा तयार करीत आहेत. स्वर्गीय राजीव राजळे यांनीच मांडलेली ही संकल्पना आता पुर्ण करण्यात येत आहे. परळीत गोपीनाथगड उभारला तसा मुंडे यांच्या मावशीच्या गावातील पुतळाही प्रेरणा देणारा असावा व त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, असेही राजळे म्हणाल्या. 

यावेळी नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे, अभय आव्हाड, सोमनाथ खेडकर, माणिक खेडकर, अशोक चोरमले, नंदकुमार शेळके, अजय भंडारी, गोकुळ दौंड, बाळासाहेब अकोलकर,अजय भंडारी यांच्यासह मुंडेप्रेमी उपस्थित होते. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A statue of Gopinath Munde will be erected in his aunt's village