
दीड कोटी रुपयांचे स्टील जप्त
अहमदनगर - बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरमधून दीड कोटी रुपयांचे स्टील चोरून साठा केलेल्या गोडाऊनवर नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या पथकाने छापा टाकला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नगर तालुक्यातील खोसपुरी येथील हॉटेल नीलकमल शेजारी असलेल्या पत्राच्या गोडाऊनमध्ये चोरीच्या स्टीलचा साठा करण्यात आला होता. हा साठा काळ्या बाजारात विकणार येणार होता. अशी माहिती पथकाला मिळाली.
या माहितीनुसार रविवारी ( ता. २२ ) रात्री दीड वाजता छापा टाकला. आरोपी राज सिंगानिया राजेश्वर (वय ४२, रा. प्रयाग्रज, उत्तर प्रदेश), राहुलकुमार कालई राव (वय २९ ), राजेश राव रामफेर (वय ३४, दोघे रा. लखनऊ) यांनी रामभाऊ सानप ( रा. पाटोदा, जि. बीड ) यांच्या सांगण्यावरून ट्रेलरवरील (एन. एल. ०१, के ७०२२ ) चालक प्रमोद छबुराव भांगरे ( वय २२, रा. भायाळा, ता. पाटोदा), मदतनीस संदीप मोहन सांगळे (वय २७, रा. पाटोदा) यांच्याशी संगनमत करून साठवून ठेवलेले स्टील मिळून आले. या स्टीलची किंमत ३७ लाख ७३ हजार ११६ रुपये इतकी आहे.
पथकाने दुसरा छापा रात्री अडीच वाजता पांढरीपुल भागातील हॉटेल संग्राम पॅलेस शेजारील गोडाऊनवर टाकला. आदिनाथ रावसाहेब आव्हाड ( वय ३६, रा. पांगरमल, ता. नगर) यांच्या सांगण्यावरून ऋषिकेश रामकिसन वाघ (रा. वाघवाडी, ता. नेवासा ), चेतन राजेंद्र हरपुडे (वय २२, रा. शिंगवे तुकाई ता. नेवासे), शिवाजी नामदेव कुराडे, गोरक्षनाथ आश्रम सावंत यांनी ट्रेलर एम. एच. २१, बी. एच. ४८६४ आणि एम. एच. १२, एस. एक्स ९८९९ वरील चालक तात्याराव अशोक सप्रे, शैलेश ज्ञानोबा तांदळे यांनी संगनमताने गोडाऊनमध्ये स्टील चोरी करण्यासाठी ठेवले. हे स्टील १ कोटी १० लाख ८८ हजार ९२९ रुपये किमतीचे आहे.
Web Title: Steel Worth Rs 15 Crore Seized
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..