esakal | कलेवर आनंदाने जगणारे आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारे हे पिता-पुत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Story of Bharatkumar Udawant and Satyajit Udawant from Nevasa taluka

ज्या घरात वडील आणि मुलगा एकविचाराने चालतात, त्या घराचं मंदिर बनतं आणि हे मंदिर आहे रंगमंदिर- चित्रमंदिर- कलामंदिर! या मंदिराचे पुजारी आहेत भरतकुमार उदावंत आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित!

कलेवर आनंदाने जगणारे आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारे हे पिता-पुत्र

sakal_logo
By
प्रा. सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : ज्या घरात वडील आणि मुलगा एकविचाराने चालतात, त्या घराचं मंदिर बनतं आणि हे मंदिर आहे रंगमंदिर- चित्रमंदिर- कलामंदिर! या मंदिराचे पुजारी आहेत भरतकुमार उदावंत आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित! कलेवर जगणारे खूप आहेत; पण कलेवर आनंदाने जगणारे आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारे हे पिता-पुत्रच. चित्रकलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत त्यांनी समाजामध्ये जनजागृती केली. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जागरूक कोरोनायोद्धा ठरले. 

संघर्ष ही जीवन हैं..! आणि ते पूर्णपणे खरे आहे. मुळात माणसाचा इतिहासच संघर्षाचा आहे. संकटांची शृंखला आणि माणसाचा अविरत संघर्ष हे चक्र थांबणारे नाही. प्रत्येक संकटाचा सामना करीत, मानवी जीवनाची सृजनशील वाटचाल दर वेळी नव्या दमाने 
सुरूच असते. कोरोनासारख्या अज्ञाताविरोधातील लढाई महसूल, पोलिस, डॉक्‍टरांसह गावागावांत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, आशा, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, महिला स्वयंसेविका यांतील प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून योगदान देत आहे. 

कोरोनाविरोधात कोरोनाचं आक्रमण झाल्यापासून नेवासे येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार भरतकुमार उदावंत व त्यांचे चिरंजीव युवा चित्रकार सत्यजित या पिता-पुत्रांनी हातात कुंचला, पेन्सिल घेऊन कोरोना संसर्गाविरोधात व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनजागृतीची खिंड लढविली. रोज नवनवीन कल्पना घेऊन ते सर्वांना सावध करीत आहेत. घरातच थांबा आणि कोरोनाचा हल्ला परतवा, असं आपल्या विविध चित्रांतून सांगतात. महसूल, पोलिस, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, प्रशासन, शासन किती मोलाचं काम करीत आहेत, हे रोज हरप्रकारे समाजाला पटवून देऊन, त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ते करतात. निरपेक्षपणे, सातत्याने समाजजागृतीचा वसा चालविणारी ही पिता-पुत्राची जोडी खरोखर धन्य होय! वर उल्लेख केलेल्या विविध सेवा करणाऱ्यांइतकीच यांचीही सेवा नक्कीच स्पृहनीय आहे. 

कोरोना प्रतिबंधासाठी व रुग्णसेवेसाठी असलेल्या हातांची जाणीव म्हणून, तसेच त्यांचे धैर्य वाढविण्यासाठी उदावंत पिता-पुत्रांनी "द सॅल्यूट' या चित्राची निर्मिती करून समाजप्रबोधनासह जनतेतर्फे मानवंदनाही दिली. कोरोना संकटकाळात डॉक्‍टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्यासह पोलिस, गृहरक्षक दलाचे जवान, शेतकरी, औषध दुकानदार, तसेच पत्रकार, वीज, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी अहोरात्र कष्ट उपसत आहेत. म्हणून आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून अनेकांच्या सेवेला सलाम म्हणून भरतकुमार व सत्यजित यांनी भारतमातेचे रंगीत, तर इतर कृष्णधवल तैलचित्रे तयार केली आहेत. 

लॉकडाउन काळात घरात बसून, 23 मार्चपासून सुरू केलेले या चित्रांचे काम आजही अविरत सुरूच आहे. या उपक्रमासाठी श्रीरामपूर येथील चित्रकार रवी भागवत यांचे मार्गदर्शनही त्यांना लाभत आहे. ऍक्रेलिक रंगातील या चित्रात पृथ्वी, भारताचा नकाशा व भारतमातेच्या रूपात डॉक्‍टर व पोलिस, सैनिक, परिचारिका, शेतकरी यांच्यासह पंतप्रधानांच्या सेवेला सलाम केलेला असून, या महामारीतून बाहेर पडू दे, अशी प्रार्थनाही देवाला केली आहे. देशसेवा म्हणून या चित्राच्या प्रती वितरित केल्या जात आहेत. यापूर्वी त्यांनी व्यसनमुक्ती, स्त्री-भ्रूणहत्या, ग्रामस्वच्छता अभियान, स्वाइन फ्लू, मतदान हे कर्तव्य आदींबाबत जनजागृती केली आहे. 

म्हणतात ना, "ज्या घरात वडील आणि मुलगा एकविचाराने चालतात, त्या घराचं मंदिर बनतं आणि हे मंदिर आहे रंगमंदिर- चित्रमंदिर- कलामंदिर! या मंदिराचे पुजारी आहेत भरतकुमार उदावंत आणि त्यांचे चिरंजीव सत्यजित! कलेवर जगणारे खूप आहेत; पण कलेवर आनंदाने जगणारे आणि दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करणारे हे पितापुत्रच. जसा कोरोना भारतात शिरला, तेव्हापासून या पिता-पुत्रांनी हातातला कुंचला खाली ठेवलेला नाही. जनता कर्फ्यू आणि लॉकडाउन सुरू झाल्यापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेवढ्या पोटतिडकीने जनतेला परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगत आहेत, तेवढ्याच कळकळीने हे उदावंत पिता-पुत्र व्यंगचित्रांच्या माध्यमातून सोशल मीडिया, वृक्ष, पाषाण, भिंतींच्या माध्यमातून समाजापर्यंत आवाहन करीत आहेत. 

एखादे काम सातत्याने सात महिने सुरू ठेवणे सोपे नाही. विषय कोरोना असला, तरी रोज नावीन्यपूर्ण चित्रे काढणे अवघडच आहे. हे दोघे जण "कोरोना'वर रोज नवनवीन व्यंगचित्रे काढतात. त्यांच्या या रोजच्या उपक्रमातून जनतेचे प्रबोधन तर होतेच; मात्र आरोग्य, पोलिस, महसूलसह कोरोनाच्या लढ्यातील सर्वच विभागांतील कोरोनायोद्‌ध्यांचं मनोबल वाढविण्याचं आणि त्यांच्या सेवेचा सन्मान करणारी चित्रं पाहून त्यांच्या अवघड कामगिरीची कल्पना येते. घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टन्स पाळा, शासनाचे आदेश पाळा असे आवाहन ते प्रत्येक चित्राखाली करायला विसरत नाहीत. 

दोन महिन्यांत शेकडो चित्रे, चारोळ्या तयार झाल्या. त्या फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर झळकल्या. त्याच्या prints काढून उत्साही कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी लावल्या. यातून भरतकुमार यांना एक रुपयाही उत्पन्न मिळाले नाही; पण देशसेवा केल्याचं अपार पुण्य मिळालं. मिळाला आनंद आणि समाधान. 

अशी ही समाजसेवा 
व्यंगचित्रकार भरतकुमार उदावंत व त्यांचे दोन्ही शिष्य प्रसिद्ध चित्रकार रवी भागवत व सत्यजित उदावंत हे व्यंगचित्रकलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाबरोबरच कॅन्सरपीडित, अपघातग्रस्तांसह अन्य रुग्णांना आर्थिक मदतीसाठी नेहमीच विविध उपक्रम राबवितात. निधी उपलब्ध करून तो संबंधितांना आर्थिक मदत म्हणून देतात. त्यांनी आतापर्यंत दहा-पंधरा पीडितांना सुमारे साडेपाच-सहा लाख रुपयांची मदत केली आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर