मंत्री गडाख यांच्या गटाकून 'मेंबर' व्हायला भाऊगर्दी; प्रभागानुसार चाचपणी

विनायक दरंदले
Sunday, 27 December 2020

सोनई ग्रामपंचायतमध्ये हमखास 'मेंबर' होण्याची खात्री असल्याने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.

सोनई (अहमदनगर) : सोनई ग्रामपंचायतमध्ये हमखास 'मेंबर' होण्याची खात्री असल्याने जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. मतदारांनीच सर्वानुमते उमेदवार देण्यासाठी आज सहाही प्रभागात बैठकाचे आयोजन करण्यात आले आहे.

येथे सहा प्रभागात १७ जागेकरीता निवडणूक होत असून ग्रामपंचायतीत गडाख गटाची एकहाती सत्ता असल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांचा आटापिटा सुरु झाला आहे. उमेदवारास शिक्षणात सातवी शिकल्याची अट असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनिल गडाख यांनी प्रत्येक प्रभागातील मोजक्या कार्यकर्त्यांची बैठक घेवून प्राथमिक चाचपणी केली. सर्वाना मतदारांची बैठक घेवून सर्वानुमते उमेदवार देण्याची सुचना त्यांनी केली. उद्या सोमवारी (ता.२८) रोजी मुळा कारखान्यावर उमेदवार चाचपणीची दुसरी फेरी होणार आहे. संघटनेचा पात्र व कमीतकमी अर्ज भरुन घेण्याचा प्रयत्न आहे.

मंत्री गडाख व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावात मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास कामे झालेली आहेत.गडाख गटाबद्दल ग्रामस्थ समाधानी आहेत. मात्र ग्रामपंचायत पदाधिकारी व काही सदस्याबाबत मोठा नाराजीचा सूर आहे. मनमानी, दादागिरी व ठेकदारी हा विषय कळीचा मुद्दा ठरु शकतो. अर्ज भरण्या अगोदरच संभाव्य उमेदवारांचा खर्च सुरु झाला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Story of Minister Shankarrao Gadakh Gram Panchayat Election in Sonai