अकरावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 February 2021

सायंकाळी आदेशवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई व तीन विवाहीत बहिणी आहेत.

शेवगाव : शहरातील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयात अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने वर्गातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. आदेश विजय म्हस्के ( वय-१८ राहणार पवार वस्ती, शेवगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो विद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता.

आज गुरुवारी (ता.२५) सकाळी आठ वाजता विद्यार्थी वर्गात आले असता खिडकीतून डोकावल्यानंतर शेजारच्या वर्गात घडलेली ही घटना लक्षात आली. त्यानंतर प्राचार्य करमसिंग वसावे यांनी पोलीसांना माहिती दिली.

हेही वाचा - आयुक्त गोरेंनी घेतली पदभार

या बाबत समजलेली माहिती अशी की, काल (ता.२४) अकरावीच्या वाणिज्य शाखेत शिकणारा आदेश म्हस्के हा महाविदयालयात नेहमीप्रमाणे आला. दुपारी १२ वाजता महाविद्यालय सुटल्यानंतर तो विद्यार्थ्यांबरोबर घरी निघून गेला. घरी गेल्यानंतर जेवण करून "दोन-तीन दिवस शाळेत येणार नाही, अशी शिक्षकांकडून परवानगी घेवून येतो" असे आई लक्ष्मीबाई यांना सांगून तो घरामधून बाहेर पडला. मात्र, जातांना त्याने स्वतः चा मोबाईल घरी ठेवून आईचा स्कार्फ सोबत घेवून गेला.

तो काल उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याची आई व नातेवाईकांनी परीसरासह महाविदयालयात जावून त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे आई लक्ष्मीबाई यांनी काल रात्री ११ वाजता मुलगा हरवल्याची शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयामध्ये दुस-या मजल्यावर दोन खोल्या असून त्यातील एक खोली बंद आहे. दुसऱ्या खोलीत ११ वीचा वर्ग भरतो. आज गुरुवार ता.२५ रोजी सकाळी आठ वाजता महाविदयालयात नेहमीप्रमाणे विदयार्थी वर्गात आले. शेजारच्या बंद खोलीच्या खिडकीतून डोकावल्यानंतर काही विदयार्थ्यांना आतमध्ये कोणीतरी गळफास घेतल्याचे दिसले. विदयार्थ्यांनी याबाबत शिक्षकांना माहिती दिली.

खात्रीनंतर प्राचार्य, उपप्राचार्य यांनी पोलीसांना ही माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पो.ना. अभिषेक बाबर, रामहरी खेडकर यांनी तेथे जाऊन मयत विदयार्थ्यांच्या नातेवाईकासमक्ष पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामिण रुग्णालयात पाठवला.

सायंकाळी आदेशवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे आई व तीन विवाहीत बहिणी आहेत. याबाबत मयताचा चुलतभाऊ संतोष बाबासाहेब म्हस्के यांच्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पो.ना. अभिषेक बाबर करीत आहेत. आत्महत्येच्या कारणाबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student commits suicide by hanging in college in Shevgaon