Success Story : अकोल्याच्या आदिवासी कन्येचा तुम्हालाही वाटेल अभिमान

Success Story: Akola's tribal girl becomes a scientist
Success Story: Akola's tribal girl becomes a scientist

अकोले ः आदिवासी पाड्यावर अजूनही शिक्षणाची गंगा पोहोचलेली नाही. आदिवासी मुलं शाळेऐवजी जंगलात, कडेकपारीत फिरत जगण्याची लढाई लढत असतात. मुलींची तर बातच सोडा. मात्र, एका कन्येने कळसूबाईलाच नव्हे तर हिमालयाला गवसणी घालण्याचे काम केले आहे. 

घरी अठराविश्वे दारिद्य्र. कुटुंब अशिक्षित असल्याने तिचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळेत झाले. "कमवा व शिका' योजनेत सहभाग घेत तिने भौतिकशास्त्र विषयात डॉक्‍टरेट मिळविली.

आता डॉ. भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरमधून फेलोशिप मिळवून तिचे संशोधन सुरू आहे. संशोधन सहकारी म्हणून ती काम पाहते. कळसूबाईच्या पायथ्याशी चिरेवाडीत राहणारी भाग्यश्री किसन भांगरे ही आता शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहत कळसूबाईच्या शिखराला गवसणी घालीत आहे. 

शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यावर तिची आता वैज्ञानिक तथा अनुसंधान परिषदेतर्फे (CSIR) संशोधन सहकारी (रिसर्च असोसिएट) म्हणून निवड झाली आहे. फेलोशिपच्या माध्यमातून ती भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधन करणार आहे. तिचा संशोधनाचा मुख्य विषय "कार्बन नॅनो हायब्रिड्‌स वापरून तयार केलेल्या ई-नोझची (आर्टिफिशियल डिक्‍शनरी सिस्टिम) निर्मिती करणे' हा आहे. 

गेल्या नऊ महिन्यांपासून आपल्या झोपडीवजा घरात, इंटरनेटद्वारे अभ्यास करून तिचे संशोधन सुरू आहे. खडकाळ जमिनीवर दोन तुकड्यांत भातलागवड करीत किसन भांगरे या शेतकऱ्याने आपल्या एकुलत्या एक मुलीला- भाग्यश्रीला शिक्षण दिले.

वडिलांची आर्थिक स्थिती आपणाला उच्चशिक्षण देण्याची नाही, हे हेरून तिने महाविद्यालयात शिकत असताना "कमवा व शिका' योजनेमध्ये काम करीत भौतिकशास्त्र विषयात डॉक्‍टरेट मिळविली. कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात तिने इंटरनेटच्या माध्यमातून काम सुरूच ठेवले.

सकाळी सहा वाजता उठून आईला घरकाम- शेतीत मदत करीत 11 ते 6 वाजेपर्यंत इंटरनेटवर ती अभ्यास करते. त्यानंतर स्वयंपाक- जेवण झाल्यावर पुन्हा 8 ते 11 संशोधनाचे काम करते. या कामासाठी आई संगीता, वडील किसन व भाऊ राजेश यांच्या कष्टापासून स्फूर्ती मिळते, असे ती सांगते. 

साकुरा सायन्स यूथ एक्‍स्चेंज प्रोग्राममध्ये निवड झाल्यानंतर ती संशोधनासाठी जपानमधील टोकियो विद्यापीठामध्ये गेली. आपल्या ज्ञानाची चुणूक तिने तेथेही दाखविली. आदिवासी भागातील मुलांनी न्यूनगंड बाळगू नये.

डॉक्‍टर होण्याऐवजी संशोधन क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तेथे करिअर करावे, असे मार्गदर्शन ती आदिवासी पाड्यांत करीत आहे. आश्रमशाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com