esakal | सहाव्या मजल्यावरून उडी मारुन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकाची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide of Ahmednagar Zilla Parishad teacher at Kolhar

शरद गोरक्षनाथ तांबे (वय 46 ) या प्राथमिक शिक्षकाने मानसिक नैराश्येतून येथील झुंबरशेठ कुंकुलोळ कॉम्प्लेक्समधील सदनिकांच्या सहाव्या मजल्याच्या टेरेसवरून उडी घेवून आत्महत्या केली.

सहाव्या मजल्यावरून उडी मारुन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकाची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हार (अहमदनगर) : शरद गोरक्षनाथ तांबे (वय 46 ) या प्राथमिक शिक्षकाने मानसिक नैराश्येतून येथील झुंबरशेठ कुंकुलोळ कॉम्प्लेक्समधील सदनिकांच्या सहाव्या मजल्याच्या टेरेसवरून उडी घेवून आत्महत्या केली. बुधवारी (ता. २) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. तांबे गुरुजी हे जिल्हा परिषदेच्या निबे- देवकर वस्तीवरील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.

त्यांच्याकडे एकदीड वर्षांपासून मुख्याध्यापकपदाचा तात्पुरता पदभार होता. त्यांच्या पत्नीचे कॉम्प्लेक्समध्ये एका गाळ्यात कापड दुकान आहे. तांबे कुटुंबीय कॉम्प्लेक्समधील वेगळ्या विंगमध्ये राहतात. 

तांबे गुरुजी बुधवारी दुपारी एफवन विंगच्या टेरेसवर गेले. तेथून त्यांनी खाली उडी घेतली. ज्याठिकाणी ते पडले तेथे एका दुकानदाराचा मालवाहू टेम्पो उभा होता. तांबे हे जमिनीवर कोसळण्यापूर्वी टेम्पोवर आदळले. अचानक झालेल्या आवाजाने आजूबाजूचे लोक गरबडले आणि घटनास्थळी धावले. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने बेशुद्धावस्थेत त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी यांनी येथे येवून घटनास्थळाची पहाणी केली. तांबे यांच्या कुटुंबियांकडून माहिती घेतली. तांबे गुरुजी यांच्या मागे आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. 

तांबे गुरुजी हे उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. गेल्यावर्षीच त्यांनी निबे-  देवकर वस्तीवरील शाळेत पाचवीचा वर्ग सुरु करून अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य सुरु केले होते.
स्पर्धा परीक्षा, स्वच्छ व सुंदर शाळा तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी वैशिष्ट्येपूर्ण काम केले. गावातील व झुंबरशेठ कुंकुलोळ कॉम्प्लेक्समधील विविध संस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमात तांबे गुरुजींचा सक्रीय सहभाग होता. ते उत्तम गायक होते. तरुण शिक्षकाच्या या अकाली निधनामुळे गावामधून हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन : अशोक मुरुमकर