अख्खे कुटुंब संपवणाऱ्या डॉक्टरांची सुसाईड नोट आली समोर, सगळा तालुकाच झाला स्तब्ध

दत्ता उकिरडे
Saturday, 20 February 2021

शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या डॉक्टर थोरात यांनी बी.ए.एम.एस.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राशीनमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ हॉस्पिटल सुरू केले.

राशीन : पत्नी व दोन मुलांना विषारी इंजेक्शन देऊन संपवणाऱ्या डॉक्टरांनी लिहिलेली सुसाईट नोट समोर आली आहे. त्यात त्यांनी आत्महत्येचे कारणही सांगितले आहे. त्यातील मजकुराने तपास यंत्रणाही सदगदित झाली.

जिवंत असताना अनेकांना मदतीचा हात देणारे आणि आपल्या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाकडे उपचारासाठी पैसे नसतील तर पदरमोड करून उपचारासोबत गोळ्या औषधे पुरवणारे डॉ. महेंद्र थोरात यांनी आत्महत्या करतानाही समाजातील कर्णबधिर मुलांचा विचार करून आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या संपत्तीतील काही वाटा कर्णबधिरांच्या संस्थेला द्यावा, असे सांगून या जगाचा निरोप घेतला. त्यांच्यात ठासून भरलेली माणुसकी आणि सामाजिक जाणीव मरणोत्तरही जपली.

शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या आणि प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या डॉक्टर थोरात यांनी बी.ए.एम.एस.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर राशीनमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ हॉस्पिटल सुरू केले. परिस्थितीची जाण आणि भान असल्याने शाळेतील मुलांना खेळताना लागले, अचानक कोणी आजारी पडले तर ते मोफत उपचार करायचे. 

कोणी वृध्द, निराधार व्यक्ती त्यांच्याकडे उपचारासाठी आली तरी ते मोठ्या संवेदनशीलपणे त्यांची काळजी घेऊन मोफत सेवा द्यायचे.  जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांनाही संगणकाचे शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी राशीनच्या शाळेस संगणक भेट दिले. 

जगदंबा विद्यालयाच्या बांधकामास त्यांनी मोठी आर्थिक मदत केली. विविध सामाजिक संस्थांना ते नेहमी मोकळ्या मनाने मदत करायचे. डॉक्टरांचा मित्र परिवार मोठा होता. समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली होती. पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी त्यांनी प्रत्यक्ष श्रमदान केले. वृक्षारोपण आणि इतर उपक्रमात त्यांचा सहभाग असायचा.

हेही वाचा - कर्डिले म्हणाले, मला संपवण्याचा डाव होता, सांगितली आतली गोष्ट

डॉक्टर म्हणून त्यांनी कधी स्वतःला वेगळे समजले नाही. रात्री- बेरात्री लोकांना सेवा देणारे गरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची राशीन पंचक्रोशीत ओळख होती. त्यांची पत्नी व मुलेही त्यांच्या सारखीच सामाजिक दृष्टीकोन ठेवणारी होती. अनेकांना समुपदेशनातून बरे करणारे, कठीण प्रसंगी धीर देणारे डॉक्टर यांनी इतका टोकाचा विचार केलाच कसा..असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

स्वत:च्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःसह पत्नी, दोन गोंडस आणि निरागस मुलांसह जीवनाचा प्रवास संपवला, हे अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. डॉ. थोरात हे जगातून गेले असले तरी त्यांचे आदर्श काम आणि त्यांचा चांगुलपणा, उत्कृष्ट सेवा कायम सर्वांच्या आठवणीत राहील.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The suicide note of the doctor who ended the whole family came in front