शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत दिवाळीनंतरच दिवाळी

Sujay Vikhe Patil's role regarding Shirdi election is unclear
Sujay Vikhe Patil's role regarding Shirdi election is unclear

शिर्डी ः नगरपंचायत वर्तुळात यंदा दिवाळीनंतर दिवाळी साजरी होण्याचे संकेत मिळत आहेत. कार्यकाल संपल्याने विद्यमान नगराध्यक्ष अर्चना कोते राजीनाम देतील. निवडणुक घेण्याची वेळ आली तर कदाचित घोडेबाजार होईल. प्रत्येक मत लाखमोलाचे होईल. त्यामुळे नगरसेवकांचे लक्ष आता दिवाळीनंतरच्या संभाव्य दिवाळीकडे लागले आहे. आचार संहितेचा काळ वगळला तर नऊ महिन्याच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी इच्छुकांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. 

दिवाळी तोंडावर आल्याने मध्यंतरी सुरू असलेल्या राजकीय हालचाली काहीशा थंडावल्या होत्या. मात्र दिवाळीनंतर नवा नगराध्यक्ष निवडल्या जाणार असल्याची बातमी काल नगरपंचायत वर्तुळात आली. त्यानंतर पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला.

नगरपंचायतीवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे वर्चस्व आहे. विद्यमान नगराध्यक्ष अर्चना कोते यांचा दीड वर्षाहून अधिकचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा द्यावा. नव्या नगराध्यक्षांची निवड करायची आहे. अशी सूचना त्यांना पुन्हा देण्यात आली. दिवाळीनंतर त्या आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. 

नगराध्यक्षपदासाठी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे सर्वानुमते एकच नाव निश्चित करणे सोपे नाही. निवडणुक झाली तर मोठी चुरस होईल. नगरसेवक मंडळींना दिवाळी नंतर दिवाळी साजरी करण्याचा योग येईल. तसेच व्हावे, अशी बहुतेक सदस्यांची अपेक्षा आहे. जगन्नाथ गोंदकर, अभय शेळके, सुजित गोंदकर, अशोक गोंदकर हि नावे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. सर्वानुमते निवड झाली तर भाजपचे शिवाजी गोंदकर यांचेही नाव पुढे आले आहे. 

नगरपंचायत वर्तुळात महत्वाचे निर्णय घेण्यासाठी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील हे पुढाकार घेत असतात. अद्याप तरी त्यांनी या बाबत भाष्य केले नाही. या सर्व घडामोडीत त्यांची भुमिका महत्वाची ठरेल. तथापि निवडणुक घेण्याची वेळ आली तर जुळवा जुळव करून ठेवलेली बरी, असा व्यवहारी विचार करून इच्छुकांनी नगरसेवक मंडळीं सोबत संपर्क सुरू केला आहे.

सतरा सदस्य असलेल्या या नगरपंचायतीत सत्ताधारी विखे गटाकडे दहा, मुळ भाजपचे तिन, शिवसेनेचा एक व तिन अपक्ष असे कागदावरचे बलाबल आहे. निवडणुक घेण्याची वेळ आली तर नवी राजकीय समिकरणे आकारास येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

नगर पंचायत निवडणुकीला जेमतेम एक वर्षाचा कालावधी राहीला. त्यातील शेवटचे तीन महिने आचार संहितेत जातील. मात्र, पुढील निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व निवडणुकीच्या तोंडावरचा जनसंपर्क या दोन बाबी महत्वाच्या समजल्या जातात. त्यामुळे या नगरपंचायतीवर आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी खासदार डाॅ. सुजय विखे पाटील दिवाळीनंतर आपले पत्ते खुले करतील. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. 

संपादन - अशोक निंबाळकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com