सुपे पोलिसांची मोठी कारवाई; रस्ता लुट करणारी टोळी गजाआड, अनेक रस्ता लुटीची प्रकरणे येणार उजेडात

मार्तंड बुचुडे
Saturday, 26 December 2020

सुपे नजिक म्हसणे फाटा टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या कारला आडवून सात हजार रूपये लुट करणाऱ्या सराईत टोळीतील पाच जणांना सुपे पोलिसांनी अवघ्या दीड तासात पकडले.

पारनेर (अहमदनगर) : सुपे नजिक म्हसणे फाटा टोलनाक्याजवळ पुण्याकडे जाणाऱ्या कारला आडवून सात हजार रूपये लुट करणाऱ्या सराईत टोळीतील पाच जणांना सुपे पोलिसांनी अवघ्या दीड तासात पकडले. मात्र त्यापैकी एक पळून गेला आहे. त्यांच्याकडून पोलीसांनी मुद्देमालही हस्तगत केला आहे. 

शुक्रवारी (ता. 24 ) रात्री 11 वाजणेच्या सुमारास पुणे येथे एका कंपनीत चालक असलेला अक्षय चखाले (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बिड हल्ली रा. मोरेवस्ती, निगडी, ता. हवेली, जि. पुणे) हा चुलत भाऊ मच्छिंद्र यास मुलगी पाहण्यासाठी घारगांव (ता. श्रीगोंदे) येथे कारने गेले होते. त्यांच्याबरोबर मामाचा मुलगा मयुर दिलीप शिंदे होता. 

तेथून परतताना ते मामास नगर येथे भेटले व जेवण करून रात्री दहा वाजता पुण्याला जाण्यासाठी निघाले असता रात्री 11 वाजणेच्या सुमारास म्हसणे फाट्यावर ही घटना घडली. ते टोलनाका ओलांडून थोडे पुढे गेले असता एका दुचाकीवरून तिघे आले व आमची कार अडवली. दुसऱ्या बाजूने दुसऱ्या दुचाकीवरून तिघे पुढे आले. त्यापैकी दोघांनी पुढे येउन चल माल काढून दे असे धमकावले. 

त्यातील एकाने अक्षय चखाले याच्या गळयास चाकू लावून खिशातील पाच हजार रूपये, आधार कार्ड बळजबरीने काढून घेतले. तर दुसऱ्या बाजूने दोघांनी मच्छिंद्र याच्या तोंडावर फटका मारून खिशातील दोन हजार रूपये काढून घेतले. ते नगरच्या दिशेने पसार झाले. याबाबत चलाखे याने सुपे पोलीस ठाण्यात तात्काळ फिर्याद दिली फिर्यादीची दखल घेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांच्या नेतृत्चाखालील पथकाने अवघ्या दिड तासांत यातील आरोपींना मुद्देमालासह जातेगाव घाटात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलजवळ गस्त घालत असताना दुचाकीवरून पळून जात असताना पकडले. 

यात नयन तांदळे (वय 26 रा. भिस्तबाग, नगर) त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ खिशात चाकू व तिन हजार रूपये तर अक्षय चखाले याचे आधारकार्ड सापडले. तर विठठल साळवे (रा. झापवाडी, ता. नेवासा) यांच्याकडे दिड हजार रूपये व मिरचीची पुड, तिसरा अक्षय ठोंबरे (रा. सावेडी, नगर) यांच्या खिशात मिरचीची पुडी आढळून आली. शाहूल पवार व अमोल पोटे (वय 28 ) दोघेही रा. सुपे, ता. पारनेर यापैकी पवार याच्या खिशात सुरा तर पोटे याच्या खिशात मिरचीची पुड आढळून आली. 
त्यातच एकजण अंधाराचा फायदा घेउन पळून जाण्यत यशस्वी झाला.

त्यांच्याकडील साहित्यावरून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. पाचही आरोपींना अटक करण्यात येउन त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींच्या अटकेमुळे रस्ता लुटची व चोऱ्यांची अनेक प्रकरणे उघडकीस येणार आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supe police arrest robber