esakal | वीटभट्टीवरील कामगाराच्या पीडीत मुलीला ‘स्नेहालय’कडून आधार
sakal

बोलून बातमी शोधा

Support to the girl from Snehalaya

अत्याचार झालेल्या बालिकेच्या रोजगार, शिक्षण व तिच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्नेहालय संस्थेने घेतली आहे, अशी माहिती संतोष धर्माधिकारी यांनी दिली.

वीटभट्टीवरील कामगाराच्या पीडीत मुलीला ‘स्नेहालय’कडून आधार

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अत्याचार झालेल्या बालिकेच्या रोजगार, शिक्षण व तिच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी स्नेहालय संस्थेने घेतली आहे, अशी माहिती संतोष धर्माधिकारी यांनी दिली.

या पिडितेच्या करुण कहाणीबाबत स्नेहालयने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीचे कुटुंब मूळचे राहता तालुक्यातील आहे. रोजंदारीसाठी हे कुटुंब अकोले येथे गेले होते. येथील टाकळी व गर्दणी गावामधील वीट भट्टीवर हे सर्व काम करीत होते. 

आई- वडील वीटभट्टीवर कामाला गेले असताना तिघांनी १५ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. फेब्रुवारी २०२० मध्ये बदनामी आणि खुनाची धमकी देऊन या ठिकाणी सातत्याने या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाले. येथे पाच महिने काम केल्यानंतर हे कुटुंब त्यांच्या गावी पुन्हा गेले. गावी गेल्यानंतर मुलीच्या पोटात दुखू लागले. हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीमुळे मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेबाबत समजल्यावर स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राने पाठपुरावा केला. 

राहाता पोलिस ठाण्यात शुन्य क्रमांकाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर अकोले पोलिस ठाण्यात ही फिर्याद पाठवण्यात आली. पिडीत मुलीसह स्नेहालयची टीम अकोले तालुक्यात पाठपुराव्यासाठी गेली. अकोले पोलिसांनी तातडीने आरोपींवर कारवाई केली. आरोपींवर कारवाई भाग झाल्यावर या पिडित मुलीच्या घरची परिस्थिती बिकट असल्याचे लक्षात आले तसेच त्या मुलीला काळजी आणि संरक्षणाची गरज असल्याचे जाणवले. मग स्नेहालयाने मुलीला बाल कल्याण समितीच्या आदेशाने स्नेहालय संस्थेत दाखल केले व सामूदायिक बलात्कारातील बळी बालिकेचे स्नेहालयात पुनर्वसन केले आहे. यासाठी बाल कल्याण समिती आणि अकोले पोलिस ठाणे येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

स्नेहालयाच्या महिला सुरक्षा आणि पुनर्वसन विभाग प्रमुख बेबीताई केंगार, कावेरी रोहोकले, स्वाती बोरगे, स्नेहांकुरचे संतोष धर्माधिकारी आणि बाळासाहेब वारुळे आणि चाइल्ड लाइन उपक्रम यांनी समन्वयाने हालचाली केल्याने बळी बालिकेपर्यंत त्वरेने मदत पोहोचली, असे स्नेहालयने स्पष्ट केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image