शेवगावातील वाळूतस्करांचे धाबे दणाणले, तहसीलदारांनी घातले छापे

सचिन सातपुते
Sunday, 6 December 2020

पिंगेवाडी व मुंगी ता. शेवगाव येथे गोदावरी नदीतील वाळू मोठया प्रमाणावर साठा करुन ठेवण्यात येते. ती वाळू बिनबोभाट आवाच्या सव्वा भावाने विकत असतात.

शेवगाव : तालुक्यातील मुंगी व पिंगेवाडी शिवारात गोदावरी नदीतील साठा केलेली वाळू जप्त करुन तिचा लिलाव केल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

या बाबत तहसीलदार अर्चना भाकड यांनी 25 ब्रास वाळू जप्त करुन पंचनामा केला. त्यानंतर तिचा लिलाव करुन ती जागेवरच विकण्यात आली. मात्र, तीन दिवस उलटूनही महसूल विभागाने ही कारवाई गुलदस्त्यात ठेवल्याने याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

पिंगेवाडी व मुंगी ता. शेवगाव येथे गोदावरी नदीतील वाळू मोठया प्रमाणावर साठा करुन ठेवण्यात येते. ती वाळू बिनबोभाट आवाच्या सव्वा भावाने विकत असतात.

या भागात वाळू तस्करांचे मोठया प्रमाणावर नेटवर्क असून कारवाईची कुणकुण लागताच साठा केलेली वाळू रात्रीतून गायब केली जाते. तर अनेकदा ज्याचा या तस्करीशी संबंध नाही अशा व्यक्तीच्या शेतात नेवून टाकली जाते. त्यामुळे वाळू तस्करांऐवजी शेतक-यांवर कारवाई होते. 

या बाबत पिंगेवाडी शिवारात मच्छिंद्र जायभाये यांच्या शेतात साठा केलेल्या वाळूची खबर महसुल प्रशासनास मिळाल्यानंतर स्वत: तहसीलदार भाकड यांनी तेथे जावून पंचनामा केला. त्यात जप्त केलेल्या 25 ब्रास वाळूचा लिलाव करण्यात आला. संबंधित जमीन मालकाला नोटीस काढून खुलासा मागविण्यात आला. मात्र बुधवार ता.2 व गुरुवार ता.3 असे सलग दोन दिवस केलेली ही कारवाई गुलदस्त्यात ठेवल्याने तेथे नेमका किती वाळूसाठा होता आणि लिलाव कोणी व किती रकमेला घेतला. याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे याबाबत लिलावानंतर ती रक्कम आणि राँयल्टी अदयाप अधिकृत चलन भरुन शासकीय तिजोरीत भरलेली नाही. त्यामुळे या कारवाई बाबत गौडबंगाल वाढले आहे. यावेळी तालुक्यातील सर्वच प्रमुख वाळू तस्कर तेथे उपस्थित होते. व त्यांनी तेथील वाळू उचलून शेवगाव शहरानजीक पुन्हा साठवली आहे. प्रत्यक्षात ही वाळू शंभर ब्रासपेक्षा अधिक असून वाळू तस्करांकडून सरकारी रकमेपेक्षा अधिक पैसे घेवून ती परस्पर विकल्याचीच चर्चा आहे. 

 

स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे पिंगेवाडी शिवारात साठा केलेल्या वाळूचा स्पॉट पंचनामा करुन प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार जागेवरच लिलाव करण्यात आला आहे.

-अर्चना भाकड - तहसीलदार, शेवगाव.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tehsil takes action against sand smugglers in Shevgaon