
तहसीलदार ज्योती देवरे यांनी दोन्ही खडी क्रशर चालकांना चार कोटी रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.
निघोज (अहमदनगर) : येथील पठारवाडीतील दोन खडी क्रशरला पारनेरच्या तहसीलदारांनी सुमारे साडेचार कोटींचा दंड केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते भानुदास साळवे यांनी नोव्हेंबर-2019 मध्ये तक्रार केली होती. मात्र, त्याची दखल न घेतल्याने, फेब्रुवारी-2020 मध्ये साळवे यांनी हरित लवादात याचिका दाखल केली.
त्यानुसार तहसीलदार ज्योती देवरे यांनी दोन्ही खडी क्रशर चालकांना चार कोटी रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. या दोन्ही खडी क्रशर चालकांनी जवळपास 22 हजार ब्रास गौण खनिजचा वापर केला असून, अनधिकृत वीज वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात केला आहे.
त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी 8 जानेवारी रोजी यासंबंधीचे लेखी आदेश संबंधित तलाठ्याला बजावले असून, हा दंड न भरल्यास संबंधित मालकांच्या सात-बारा उताऱ्यावर बोजा चढविला जाणार असल्याची माहिती समजली.