esakal | डॉक्टरकीची कागदपत्र मागताच मुन्नाभाई पसार

बोलून बातमी शोधा

Fake doctor
डॉक्टरकीची कागदपत्र मागताच मुन्नाभाई पसार
sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः तालुक्‍यातील भोजापूर येथील क्‍लिनिकला प्रांताधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांनी भेट दिली. प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरकडे त्यांनी शैक्षणिक प्रमाणपत्रांची मागणी केल्याने या "मुन्नाभाई'ने तेथून धूम ठोकली. तालुका आरोग्याधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे मंगळवारी (ता. 27) तालुक्‍यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विलगीकरण केंद्रांची पाहणी करीत होते. निमगाव भोजापूर येथे शैलेश किसन कडलग याच्या क्‍लिनिकला त्यांनी भेट दिली.

कडलगशी चर्चा करताना त्याच्या वैद्यकीय ज्ञानाबाबत स्वतः डॉक्‍टर असलेले प्रांताधिकारी मंगरुळे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची प्रमाणपत्रे व रुग्णालयाच्या परवान्याची मागणी केली. त्यामुळे या "मुन्नाभाई'ने तेथून धूम ठोकली.

याबाबत प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांनी तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुरेश घोलप यांना कडलगवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार तालुका आरोग्याधिकारी डॉ. घोलप यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

बोगस डॉक्‍टरांच्या यादीत होते नाव

शैलेश किसन कडलग या "मुन्नाभाई'चे नाव आरोग्य विभागाच्या बोगस डॉक्‍टरांच्या शोधयादीत नमूद आहे. मात्र, कोविड प्रादुर्भावाने ही मोहीम थंडावल्यामुळे कडलगचा धंदा कालपर्यंत सुखेनैव सुरू होता. प्रांताधिकाऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात अखेर त्याचा भांडाफोड झालाच.