esakal | सिद्धटेक : धार्मिक पर्यटन पुन्हा कोलमडले

बोलून बातमी शोधा

religious tourism
सिद्धटेक : धार्मिक पर्यटन पुन्हा कोलमडले
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

सिद्धटेक (अहमदनगर) : सद्यस्थितीत कोरोनाच्या वाढत्या प्रसारानंतर आता राज्यभर संचारबंदीसह कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. या परिस्थितीचा मोठा फटका धार्मिक पर्यटनाला बसला असून त्या-त्या ठिकाणचे अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाले आहे. धार्मिक पर्यटनाच्या ऐन हंगामात कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याने पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

राज्यातील महत्त्वाच्या तीर्थस्थळांबरोबरच अष्टविनायक स्थळांच्या होत असलेल्या विकासामुळे धार्मिक पर्यटन म्हटले की, ही स्थाने म्हणजे समीकरणच बनले आहे. डोंगर-दऱ्या, विविध पर्यटन प्रकल्प, नौकानयन हे पर्यटकांचे खास आकर्षण असते. मागील वर्षीच्या लॉकडाऊननंतर हळूहळू पर्यटन व्यवसाय सुरू होऊन तो बहरत असतानाच आता पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भावही दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यात नवीन नियमावलीची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी त्याचा सर्वात मोठा फटका धार्मिक पर्यटन व्यवसायासह त्यावर अवलंबून असलेल्या अन्य पूरक व्यवसायांना बसला आहे. पर्यटनाच्या ऐन हंगामातच हे संकट समोर आल्याने व्यवसायिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा: दु:खं बाजुला सावरून मंत्री गडाख उतरले मैदानात

आगाऊ बुकिंग रद्द

मागील वर्षी दिवाळीपासून हळूहळू धार्मिक पर्यटन व्यवसाय ताकदीनिशी सुरू झाला होता. त्यावर अवलंबून असलेल्या लघु व्यवसायकांनी गती पकडली होती. त्यामुळे पूर्वी विस्कटलेली घडी पुन्हा मूळ पदावर येईल, अशी आशा त्यांना होती. मात्र सुरुवातीपासूनच राज्यभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. त्यामुळे कडक नियमावलीची अंमलबजावणी सुरू झाल्याने पर्यटनाचा आनंद लुटण्याचा 'प्लॅन' केलेल्या बहुतांश भाविकांनी आगाऊ केलेले बुकिंग रद्द केले आहे. यामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस तसेच पर्यटनस्थळी असलेल्या हॉटेल्स आदींचा समावेश आहे.

भांडवल मोकळे करायचे कसे

नौकानयनसारखे व्यवसाय बंद झाल्याने स्थानिक कर्मचाऱ्यांच्या रोजगारासह त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. पूजा साहित्याची दुकाने बंद झाली. घरगुती अस्सल चव देणारी चंद्रमौळी हॉटेल बंद झाली असून पर्यटकांना थंडगार करणारी रसवंतीगृहेसुद्धा थंडावली आहेत. गरमागरम रबरबीत मक्याच्या कणसाची विक्री थांबली आहे. लहानपणापासूनच पैशांच्या गणितात गुंतलेली हार-फुले विकणारी मुले आता कुठे अभ्यासात रमली आहेत.

हेही वाचा: जळीत झालेल्या उसतोडणी कामगारांना उदयन गडाखांनी केली तातडीची मदत

यंदाचा 'चैत्र'ही यात्रोत्सवाविनाच..!

दरवर्षी चैत्र महिन्यात अनेक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी यात्रोत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात. त्यामुळे परगावी असणारी स्थानिक मंडळी, पाहुणे एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात.

यादरम्यान होणारी मोठी आर्थिक उलाढाल यंदाही थंडावली आहे. परिणामी लहान-मोठे व्यावसायिक धास्तावले आहेत. भीमा नदीकाठावरील लालहरी महाराज, भैरवनाथ, लाडूबाई, धर्मनाथ महाराज, सिद्धेश्वर महाराज अशा महत्त्वाच्या यात्रांसह इतर उत्सवही रद्द झाले आहेत. वरील सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याने पूजापाठ करणारे पुरोहित, गुरव, पुजारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

पर्यटनाच्या हंगामातच कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला आहे. याचा फटका नौकानयन व्यवसायास बसला आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रसार रोखणे महत्त्वाचे असल्याने हा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. असे असतानाही शासनाकडे आगाऊ स्वरूपात कर भरावाच लागतो. त्यामुळे नौकानयन व्यवसायिकांना शासनाने पॅकेज देण्याची गरज आहे.

- दादासाहेब भोसले, सिद्धिविनायक बोट क्लब.