esakal | संगमनेरातील गर्दी हटेना, बाधितांचा आकडाही घटेना

बोलून बातमी शोधा

संगमनेर बाजार गर्दी

संगमनेरातील गर्दी हटेना, बाधितांचा आकडाही घटेना

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः संगमनेर शहर परिसरात कोरोनाचा आकडा कायम आहे. तो कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांवर बेफिकीर व्यक्तींमुळे पाणी फेरले जात आहे. अनेक जण सकाळी सात ते 11 या काळात औषधखरेदीसह किराणा, भाजीपाला व रुग्णाला जेवणाचा डबा पोचविण्यासाठी जाण्याच्या बहाण्याने शहरात फिरत आहेत. असंवेदनशील नागरिकांच्या अट्टहासापुढे पोलिस व प्रशासनाने हात टेकले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना कडक केल्या आहेत. या उपाययोजनेत फक्त सकाळी सात ते अकरा या मर्यादित कालावधीत जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. भाजीपाला, फळेविक्रेत्यांना हातगाडीवरून द्वारविक्री करण्यास परवानगी आहे; मात्र हा नियम संगमनेरसाठी लागू होत नसल्याच्या आविर्भावात सुरवातीपासून भाजीपालाविक्री धडाक्‍यात सुरू आहे.

पूर्वी शनिवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला घेणारे नागरिक रोज ताज्या भाजीपाल्यासाठी कोविडचा धोका पत्करून गर्दीत फिरत आहेत. किराणा, कृषीउपयोगी वस्तूंच्या दुकानांशिवाय अर्धवट शटर उघडून चप्पल, बूट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व इलेक्‍ट्रिकल वस्तू, कापड, पूजासाहित्य विक्रीची दुकाने, कटलरी व इतर घरगुती प्लॅस्टिक सामान विक्रेत्यांची दुकाने सुरू आहेत. यामुळे संगमनेरातील गर्दी कमी होत नाही.

रोज सकाळी अकरापर्यंत शहरातील बसस्थानकासमोर, तसेच दिल्ली नाका, नवीन नगर रस्ता परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरू असताना, शहराच्या अंतर्भागात मात्र खुलेआम गर्दी होताना दिसून येत आहे. यामुळे नगरपरिषद, महसूल प्रशासन व आरोग्य विभाग, तसेच राजकीय नेते व पदाधिकाऱ्यांनी कंठशोष करून केलेल्या आवाहनाला शून्य प्रतिसाद मिळत आहे.

शहरात कोविड रुग्णांना दाखल करण्यासाठी बेड, ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्‍शने यांची टंचाई असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहूनही, संवेदना हरवलेले विक्रेते व नागरिक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. या पार्श्वभूमीवर कोविडची रुग्णसंख्या कशी कमी होणार, हा प्रश्न भेडसावतो आहे.

भाजीपाला विक्रेत्यांच्या पथाऱ्या कायम

अकोले रस्त्यावरील भाजीपाला बाजार प्रशासनाने उठवला तरी शहरातील नेहरू चौक, गांधी चौक, नारळ गल्ली, पेटिट हायस्कूल परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांच्या पथाऱ्या कायम आहेत.