आढळा तुडुंब! आठ गावांसाठी वरदान ठरलेल्या प्रकल्पातून अजून आवर्तनाची मागणी नाही

आनंद गायकवाड
Sunday, 20 December 2020

अकोले व संगमनेर तालुक्‍यांतील आठ गावांसाठी वरदान ठरलेल्या, एक हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पात आज एक हजार 29 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे.

संगमनेर (अहमदनगर) : अकोले व संगमनेर तालुक्‍यांतील आठ गावांसाठी वरदान ठरलेल्या, एक हजार 60 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या आढळा मध्यम प्रकल्पात आज एक हजार 29 दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे.

मात्र, गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षी रब्बीच्या आवर्तनासाठी कालवा सल्लागार समिती किंवा संगमनेर तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी आली नसल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. 

या वर्षी पावसाने आढळा प्रकल्प समाधानकारकरीत्या भरला असून, आढळा नदी अद्यापही काही प्रमाणात वाहते आहे. यामुळे पुढील हंगामासाठी पिण्याचे पाणी राखीव ठेवूनही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात एकूण 3 हजार 914 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आहे. गणोरे शाखेअंतर्गतच्या आठ गावांतील 2 हजार 422 हेक्‍टर क्षेत्रापैकी उजव्या कालव्यांतर्गत संगमनेर तालुक्‍यातील धांदरफळ, जवळे कडलग, वडगाव लांडगा ही गावे आहेत. चिकणी शाखेअंतर्गतच्या डाव्या कालव्यावर नऊ गावांतील एक हजार 491 हेक्‍टर क्षेत्र येते. यात संगमनेर तालुक्‍यातील चिकणी, निमगाव भोजापूर, राजापूर, जवळे कडलग, कासारवाडी ही गावे येतात. 

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर या वर्षी नोव्हेंबरमध्येच लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतींना जलसंपदा विभागाने आवर्तनाच्या नियोजनाबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याला अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. कालवा सल्लागार समिती आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर मुख्य कालव्यांची स्वच्छता आणि दुरुस्ती जलसंपदा विभाग करणार असून, पोटचाऱ्यांची दुरुस्ती लाभधारक शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. 
 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no demand for recurrence from the project which has been a boon for eight villages