पवार संरक्षण मंत्र्यांना भेटले अन प्रश्नच मिटला, केके रेंजसाठी भूसंपादन होणार नाही

सनी सोनावळे
Friday, 18 September 2020

के.के.रेंज जमीन अधिग्रहण बाबत बाधित गावांना दिलासा मिळणार आहे. जेष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची चर्चा फलदायी ठरली असून या भागातील जमिनींचे भुसंपादन होणार नसल्याचे बैठकीत सिंग यांनी सांगितले असल्याची माहीती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.

टाकळी ढोकेश्वर (नगर) : के.के.रेंज जमीन अधिग्रहण बाबत बाधित गावांना दिलासा मिळणार आहे. जेष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची चर्चा फलदायी ठरली असून या भागातील जमिनींचे भुसंपादन होणार नसल्याचे बैठकीत सिंग यांनी सांगितले असल्याची माहीती आमदार निलेश लंके यांनी दिली आहे.

आज (ता.१८) रोजी नवी दिल्ली येथे पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील गावांमधील महत्त्वाचा विषय ठरत असलेल्या के.के.रेंज जमीन अधिग्रहण बाबत जेष्ठ नेते शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. या बैठकीचा सविस्तर वृत्तांत लंके यांनी माध्यामांना दिला आहे.

या बैठकीत पवार यांनी सिंग यांना या भागातील भूसंपादन करण्यास विरोध केला व भूसंपादन झाल्यास या भागातील शेतकरी विस्थापित होतील, तसेच मुळा धरण, कृषी विद्यापीठ झाल्यामुळे लोकांचे पहिलेच विस्थापन झाले आहे. मुळा धरण असल्यामुळे हा भाग बागायती झालेला आहे. 

या भागातील प्रमुख पीक डाळिंब, ऊस यासंह गायी, शेळ्यामेंढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्थलांतर करणे शक्य नाही, या बाबी संरक्षण मंत्र्यांना निर्दशनास आणून दिले. तसेच गेल्या चार दिवसांपासून या पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे देखील या प्रश्नाबाबत आपल्या भेटीसाठी दिल्लीत थांबून असल्याचे देखील आवर्जून सांगितले. लंके यांनीही भुसंपादन बाबत योग्य ती माहिती सिंग यांनी दिली.

येथील सरावा दरम्यान संरक्षण क्षेत्रात प्रवेश केल्याने गोळीबारात अनेकांचे प्राण गेले आहेत, या भागातील जमीन असल्याने बँक कर्ज नाकारतात. यासंह अन्य बाबी निर्दशनास आणून दिल्या. त्यावर सिंह यांनी यापुढे या बाबतीत कोणताही निर्णय घेत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी, संरक्षण अधिकारी व ग्रामस्थ यांमधे सर्व प्रथम बैठक होईल. तसेच बँक अधिका-यांची देखील शेतक-यांना कर्जपुरवठा बाबत बैठक करू, असे आश्वासन दिले आहे. यावेळी सरपंच राहुल झावरे,सभापती अण्णा सोडणार, जिल्हा परिषद सदस्य धनंजय गाडे उपस्थित होते.

पवार व लंके यांचा एकाच विमानातून प्रवास...

के.के.रेंज संदर्भात जेष्ठ नेते शरद पवार व संरक्षण मंत्री राजनाथ यांची बैठक पार पडल्यानंतर पवार व लंके मुंबई करीता एकाच विमानातून प्रवास करत मुंबईकडे रवाना झाले. आमदार लंके यांच्यावर पवार यांचे विशेष प्रेम आहे. हे आम्हा कार्यकर्त्यांसाठी खूप अभिमानाची बाब असल्याचे सरपंच राहुल झावरे यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be no land acquisition for the KK range