'त्यांची' लॉकडाउनमधून सुटका

student bus 1
student bus 1

नगर : राज्यांची संस्कृती अभ्यासण्यासाठी गेलेल्या नगर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील 16 विद्यार्थी उत्तर प्रदेशातील उन्नावच्या नवोदय विद्यालयातून आज अखेर इकडे यायला निघाले. तसेच, उत्तर प्रदेशातील नवोदय विद्यालयाचे 23 विद्यार्थी तारकपूर बसस्थानकातून त्यांच्या गावी रवाना झाले. त्यामुळे पालकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. नगरचे विद्यार्थी उद्या (सोमवारी) रात्री उशिरा येथे दाखल होणार आहेत. 

दरम्यान, उत्तर प्रदेशातील 23 विद्यार्थीही टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयात अडकले होते. नगरला अडकलेले 23 विद्यार्थी उन्नाव येथे सोडून, तेथील 16 विद्यार्थी नगरला आणण्याबाबत नवोदय विद्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत, नगरमधील विद्यार्थ्यांना आणण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र, राज्याच्या सीमाबंदीची आडकाठी आली. उत्तर प्रदेशात अडकलेल्या नगरच्या विद्यार्थ्यांमध्ये आठ मुली व आठ मुलांचा समावेश आहे. नगरमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशाच्या विद्यार्थ्यांमध्ये 15 मुले व 8 मुलींचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी वर्षभरापासून राज्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी गेले होते

.

अभ्यास पूर्ण झाल्यानंतर परतण्याची वेळ आली आणि देशात लॉकडाउन करण्यात आले. जाण्या-येण्याचे सर्व मार्ग खुंटल्याने विद्यालयाने पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते. अखेर केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात अडकलेले विविध स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, इतर नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्याच्या प्रक्रियेस वेग आला. नगर व उत्तर प्रदेश येथून निघालेल्या बस मध्य प्रदेशातील राजगडच्या कछनिरिया येथील जवाहर नवोदय विद्यालयात जाणार आहेत. या बस तेथे उद्या (सोमवारी) पहाटे पाच-सहा वाजता पोचतील. तेथून विद्यार्थ्यांची अदलाबदल होऊन बस पुन्हा ज्या-त्या जिल्ह्यांत रवाना होतील. 
 

एसटी महामंडळाकडून खबरदारीच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नवोदय विद्यालयातील उत्तर प्रदेशाच्या मुलांना घेऊन आज सकाळी सात वाजता बस रवाना झाली. सोबत विद्यालयातील एक शिक्षिका, एक शिक्षक असून, दोन चालक पाठविले आहेत. ते उद्या (सोमवारी) मध्य प्रदेशातील राजगडच्या नवोदय विद्यालयातून नगरच्या विद्यार्थ्यांना घेऊन नगरला येतील. 
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com