चार हजार अनवानी वाटसरूंच्या पायांत घातल्या त्यांनी चपला 

संजय आ. काटे / मार्तंड बुचुडे
Wednesday, 20 May 2020

नगर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील 27 गावांमधील तीन हजार कुटुंबांना त्यांनी किराणा दिला. स्वगृही परतणाऱ्या काही अनवाणी लोकांना आणि तुटलेल्या चपला घालून जाणाऱ्या अनेकांना पाहिल्यावर त्यांनी पुणे व नगर जिल्ह्यांत चार हजार लोकांच्या पायांत चपलांचे नवे जोड रस्त्यावर उभे राहून घातले! 

श्रीगोंदे : राजकारणात आघाडीवर असलेले बहुतांश नेते लोकांसाठी होम क्वारंटाईन असताना, सुपरस्टार रजनीकांत यांच्या दया फाउंडेशनचे विश्वस्त व पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख सहकाऱ्यांसह गेले दोन महिने लोकांसाठी रस्त्यावर आहेत. नगर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील 27 गावांमधील तीन हजार कुटुंबांना त्यांनी किराणा दिला. स्वगृही परतणाऱ्या काही अनवाणी लोकांना आणि तुटलेल्या चपला घालून जाणाऱ्या अनेकांना पाहिल्यावर त्यांनी पुणे व नगर जिल्ह्यांत चार हजार लोकांच्या पायांत चपलांचे नवे जोड रस्त्यावर उभे राहून घातले! 

सामाजिक चळवळीत असलेल्या देशमुख यांचा विविध सेवाभावी संस्थांशी संपर्क आहे. सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी जवळीक ठेवून त्यांनी सामाजिक काम उभारले आहे. मुकुल माधव फाउंडेशन, जागृती फाउंडेशन, नाम फाउंडेशन आदींच्या माध्यमातून ते काम करीत असतानाच, सरकारच्या नदीजोड प्रकल्पाचेही काम ते पाहत आहेत. यापूर्वी त्यांनी महापुराच्या वेळी कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना बावीस ट्रक किराणा व दहा ट्रक कपडे पाठविले होते.

हेही वाचा ः लॉकडाऊनमध्ये वंचितांसाठी धावली लोकपंचायत

सध्या कोरोनापीडित व्यक्तींसाठी देशमुख कार्यरत आहेत. श्रीगोंदे, नगर व पारनेर येथील, तसेच उस्मानाबाद येथील तीन हजार कुटुंबांच्या चुली पेटवितानाच, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात अथवा परप्रांतात पायी जाणाऱ्या वाटसरूंसाठी देशमुख व त्यांचे सहकारी देवदूत बनून उभे राहिल्याचे चित्र दिसले. सरकारने नागरिकांना दुसरीकडे जाण्याची मुभा दिल्यानंतर अनेक ठिकाणी मजूर रस्त्याने पायी प्रवास करीत होते. त्यांतील अनेकांच्या चपला तुटल्या होत्या, तर काही जण रणरणत्या उन्हात डांबरी रस्त्याचे चटके सहन करीत अनवाणी मार्गक्रमण करीत होते. देशमुख यांनी अशा व्यक्तींसाठी चार हजार चप्पलजोड दिले. पुणे-बंगळूर महामार्गावर थांबून त्या मजुरांच्या पायांत चपला घालण्याचे काम देशमुख यांच्यासह राहुल शिंदे, चारुशीला वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. 

राज देशमुख

पारनेर, सुप्यातही चप्पलवाटप 
पारनेर ः नगर-पुणे महामार्गावरून जाणारे परप्रांतीय, तसेच मराठवाडा, विदर्भात गडचिरोली या ठिकाणी पारनेर व सुपे बसस्थानकावरून जाणाऱ्या मजुरांसाठी मुकुल माधव फाउंडेशन व राहुल शिंदे मित्रमंडळाच्या वतीने सुमारे दोन हजार चप्पलजोडांचे वाटप करण्यात आले. फाउंडेशनच्या अध्यक्ष रितू छाब्रिया यांच्या वतीने राज देशमुख यांनी पारनेर तालुक्‍यात हा उपक्रम राबविला. फाउंडेशनचे योगेश गायकवाड, पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, पारनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, शंकर नगरे, नवनाथ गाडगे, आदिनाथ औटी आदी उपस्थित होते. 

वाचा ः अंगणवाडी सेविका, आशा सेविकांची व्यथा आमदार लंके यांनी मांडली मुख्यमंत्र्यांकडे

पारनेर बसस्थानकावरून मराठवाडा, विदर्भ, गडचिरोली आदी ठिकाणी जाणाऱ्या मजुरांसाठी बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे मोठ्या संख्येने मजूर जमा झाले होते. हे औचित्य साधून या मजुरांना चपलांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सुपे बसस्थानक, तसेच नगर-पुणे महामार्गाने जाणारे मजूर व रुईछत्रपती येथील गरजू कुटुंबांनाही चपलांचे वाटप करण्यात आले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They slipped at the feet of four thousand barefoot walkers