esakal | राहुरीत चोरांनी पोलिसदादाचेच घर फोडले...काय काय चोरले वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

 Thieves broke into the house of a policeman in Rahuri

कायदा व सुव्यवस्था नावापुरती शिल्लक राहिली आहे. सामान्य जनता वाऱ्यावर असतांना थेट पोलिसाचे घर चोरट्यांनी टार्गेट केल्यामुळे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

राहुरीत चोरांनी पोलिसदादाचेच घर फोडले...काय काय चोरले वाचा

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : राहुरी शहरात नेहमी चोऱ्या होतात. सर्वसामान्यापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचेच घरे किंवा बंगले फोडले आहेत. चोरांनी थेट पोलिसदादाच्या घराकडेच मोर्चा वळवला.

मागील वर्षभरापासून घरफोडी, दरोड्याच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख अपयशी ठरले आहेत. आता, त्यांच्याच हाताखाली काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी करून, चोरट्यांनी आव्हान दिले आहे.

हेही वाचा - दगडाला अभिषेक घालून मोदी सरकारचा निषेध

राहुरी शहरात आज (सोमवारी) पहाटे तीन वाजता बिरोबानगर येथे दाट लोकवस्तीत भाडोत्री घरात राहणारे राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक वैभव साळवे यांच्या घरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

काल साळवे कुटुंब सोनई येथे जवळच्या नातेवाईकाच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. तेथे ते मुक्कामी राहिले. चोरट्यांनी बंद घराच्या मागील बाजूने असलेल्या स्वयंपाक घराचा दरवाजा फोडून प्रवेश केला. बेडरूममधील सामानाची उचकापाचक केली.

लोखंडी कपाटातील वीस हजार रुपये व लाकडी कपाटातील सोन्या-चांदीचे 40 हजार रुपये किमतीचे दागिने असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

छाया वैभव साळवे (वय 36, रा. बिरोबानगर, राहुरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांनी घटनास्थळी पाहणी केली.

ठसे तज्ञ व श्वान पथकाला बोलविण्यात आले आहे. पोलीस श्वानाने डॉ. मेळवणे हॉस्पिटल समोरून नगर मनमाड महामार्ग पर्यंत माग काढला. आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जाणार आहेत.

मागील तीन-चार महिन्यांपासून तालुक्यात मटका, जुगार‌ अड्डे, हातभट्टीची दारू विक्री, अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. कोरोना संकटात अवैध धंदे वाढले आहेत. मागील वर्षभरात घरफोड्या व दरोड्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आलेले अपयश गुन्हेगारांचे धाडस वाढवीत आहे.

कायदा व सुव्यवस्था नावापुरती शिल्लक राहिली आहे. सामान्य जनता वाऱ्यावर असतांना थेट पोलिसाचे घर चोरट्यांनी टार्गेट केल्यामुळे पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर