राहुरीत चोरांचा धुमाकूळ; दोन घरफोड्या, सोन्याच्या दुकानातून सव्वा चार लाखांचा ऐवज लंपास

विलास कुलकर्णी 
Wednesday, 13 January 2021

मंगळवारी सकाळी सात वाजता दुकानाच्या लाकडी फळ्या उघडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले.

राहुरी (अहमदनगर) : शहरात मंगळवारी पहाटे तीन वाजेपर्यंत चोरांनी धुमाकूळ घातला. दोन घरफोड्या करून, भर पेठेतील शिवाजी चौकातील 'संतोष ज्वेलर्स' दुकान फोडले. तेथून साडेसहा किलो चांदीचे व 45 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, असा 4 लाख 30 हजारांचा ऐवज पळविला. राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

मंगळवारी सकाळी सात वाजता दुकानाच्या लाकडी फळ्या उघडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. 'मिश्‍का' नावाच्या श्वानाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत मार्ग काढला. याबाबत संतोष गोटीराम नागरे (वय 42, रा. राहुरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, चांदीचे पैंजण, मुर्त्या, लहान मुलांचे कडे, जुनी चांदीची मोड, असा साडेसहा किलो चांदीचा 2 लाख 34 हजारांचा ऐवज, तसेच सोन्याच्या मुरण्या, नथा, बाळ्या, खड्याचे टॉप्स, असा 45 ग्रॅमचे एक लाख 96 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

चोरट्यांनी शुक्‍लेश्वर मंदिर परिसरातील कासार गल्लीतील विजय विठ्ठलराव आकडे यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून, घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. कपाटातील 10 हजार रुपये घेऊन चोर पसार झाले. याच परिसरातील सगळगिळे यांचे बंद घर चोरांनी फोडले. सगळगिळे बाहेरगावी गेल्याने, त्यांच्या घरातून नेमका किती मुद्देमाल चोरीला गेला, याची माहिती मिळाली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves have been rampant in Rahuri city till 3 am on Tuesday