esakal | सलाम! खाकी वर्दीचा रक्तदानासाठी पुढाकार; महाराष्ट्र दिनी शिबिराचं आयोजन

बोलून बातमी शोधा

P.I. Sambhaji Gaikwad

जामखेड पोलिस स्टेशनच्या स्थापनेपासून रक्तदान शिबिर पोलिसांच्या पुढाकाराने पहिल्यांदा होत आहे.

सलाम! खाकी वर्दीचा रक्तदानासाठी पुढाकार; महाराष्ट्र दिनी शिबिराचं आयोजन

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

जामखेड (अहमदनगर) : 'पोलीस' म्हटलं की समाजाच्या संरक्षणासाठी दिवसरात्र राबणारी यंत्रणा, विना परवाना व्यावसायाला निर्बंध घालून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्पर असणारी यंत्रणा अशी सर्वसाधारण ओळख आहे. पण त्यापलीकडे ही आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून जामखेड पोलिसांनी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तसे पाहता जामखेड पोलिस स्टेशनच्या स्थापनेपासून रक्तदान शिबिर पोलिसांच्या पुढाकाराने पहिल्यांदा होत आहे.

राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताचा तुडवडा निर्माण झाला असून मागणी वाढली आहे. याशिवाय कोरोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या स्वंयसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. नगर जिल्ह्यातही रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र याकडे स्वयंसेवी संस्था व लोकप्रतिनिधींचे दूर्लक्षित झाल्याचे चित्र आहे. मात्र जामखेड पोलिस दल यासाठी धावून आले आहे. अन् त्यांनी महाराष्ट्राच्या ६२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजिन केले आहे.

हेही वाचा: तहलिसदार देवरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांची घेतली भेट

जामखेडचे पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड जामखेडला रुजू झाल्यापासून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळल्याच शिवाय त्यांच्या संकल्पनेतून विधायक उपक्रम ही राबविले. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या "जागृती" करिता सोशल मीडियाच्या माध्यमातून राबविलेले अभियान समाजमनावर राज्यकरणारे ठरले. त्याला उत्सफूर्त प्रतिसादही मिळाला. त्याचाच एक भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महावीर मंगल कार्यालयात पार पडणार आहे.

"जगातील सर्वश्रेष्ठ दान असलेल्या रक्तदानाच्या या "महायज्ञात" जामखेड तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन "मानवते" च्या कार्याचा भाग बनावे. राज्यात 18 वर्षावरील सर्वांचे कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या काळात पुढील दीड ते दोन महिने लस घेतलेल्या नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता लसीकरणाआधी युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याची आवश्यकता आहे ".

- संभाजी गायकवाड, पोलिस निरीक्षक, जामखेड.