थोरात कारखान्याने उच्चांकी भाव अन बोनसही दिला

आनंद गायकवाड
Sunday, 25 October 2020

यंदाच्या गळीत हंगामातील पहिल्या 111 साखरपोत्यांचे पूजन नूतन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते.

संगमनेर : सहकार चळवळीतून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली असून, कायम उच्चांकी भाव देत सभासद, कामगार व शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या व सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे काम उत्कृष्ट असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले. 

यंदाच्या गळीत हंगामातील पहिल्या 111 साखरपोत्यांचे पूजन नूतन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते.

मावळते जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी जिल्हाधिकारी संदीप निचित, तहसीलदार अमोल निकम, बाजीराव खेमनर, शिवाजीराव थोरात, मीरा शेटे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. 

डॉ. भोसले म्हणाले, ""सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम उच्चांकी भाव देताना सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. या वर्षी कोरोनाचे संकट व आर्थिक मंदी असतानाही "एफआरपी'पेक्षा जास्त भाव देत कामगारांसाठी 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले आहे. तसेच, शेतकऱ्यांना परतीच्या ठेवीवर व्याजही दिले आहे.

या कारखान्याचा हंगाम नुकताच सुरू झाला असून, नवीन उत्पादित 111 साखरपोत्यांचे पूजन हा दुग्धशर्करा योग आहे. सामान्य जनतेच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय 24 तास सुरू राहील.'' 
कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले. संतोष हासे यांनी आभार मानले. 
...... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Thorat factory also offered high prices and bonuses