तीन एकर ऊसाचा कोळसा; वीजवाहक तारांमधील घर्षणाणे ठिणगी पडली

आनंद गायकवाड
Saturday, 31 October 2020

उसाच्या क्षेत्रावरून गेलेल्या वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या पडून लागलेल्या आगीत साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना तालुक्‍यातील कनोली येथे घडली.

संगमनेर (अहमदनगर) : उसाच्या क्षेत्रावरून गेलेल्या वीजवाहक तारांमधील घर्षणामुळे ठिणग्या पडून लागलेल्या आगीत साडेतीन एकर ऊस जळून खाक झाला. ही घटना तालुक्‍यातील कनोली येथे घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी : कनोली शिवारात गोरखनाथ, रोहिदास व रावजी काशिनाथ वर्पे यांच्या मालकीच्या गट क्रमांक 493, 494मधून वीज वितरण कंपनीच्या मुख्य वीजवाहिनीच्या तारा गेल्या आहेत. या तारांमध्ये झोळ पडल्याने, त्या एकमेकींना चिकटल्या. शॉर्टसर्किट होऊन त्यातून आगीचे लोळ तोडणीला आलेल्या उसावर पडून उसाने पेट घेतला.

आगीने रौद्र रूप धारण केलेले पाहून परिसरातील अजित वर्पे, नाना दिघे, गोकुळ काळे, नंदू ठोंबरे, राजेंद्र वर्पे, सत्यम राहाणे, निखिल वर्पे, दौलत वर्पे, नीलेश राहाणे, सुयोग वर्पे, भानुदास वर्पे, सुमीत वर्पे, महेश वर्पे आदींनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. युवकांनी 40 एकर ऊस वाचविला. मात्र, या दरम्यान साडेतीन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाल्याने, या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 

वीजवाहक तारा अतिशय जीर्ण झाल्या असून, अनेक वर्षांपासून त्यांची देखभाल- दुरुस्ती नसल्याने, तारांना झोळ पडला आहे. वाऱ्यामुळे त्या एकमेकींना चिकटून शॉर्टसर्किट होते. मागील वर्षी अशाच दुर्घटनेत गायींचा मृत्यू झाला होता. वीज वितरण कंपनीने याची दखल घ्यावी. 
- रावजी वर्पे, शेतकरी, कनोली  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three acres of sugarcane caught fire due to sparks from power lines