संगमनेरात साडेतीन हजार जणांना मिळणार कोरोना लस

आनंद गायकवाड
Friday, 25 December 2020

या लसीकरणासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्या समन्वयाखाली कृती दल स्थापन करण्यात आले.

संगमनेर ः कोरोनाच्या पार्श्वभुमिवर तालुक्‍यात लसीकरणासाठी आरोग्य विभागासह प्रशासन सज्ज झाले असून, यासाठी लसीकरण कृती दल स्थापन करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील तीन हजार 508 डॉक्‍टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली. 

या लसीकरणासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्या समन्वयाखाली कृती दल स्थापन करण्यात आले.

या समितीत तहसीलदार अमोल निकम, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, गट शिक्षणाधिकारी साई लता सामलेटी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलिस निरीक्षक आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

तालुक्‍यातील ग्रामीण रुग्णालय, 10 प्राथमिक आरोग्य केंद्र, एक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, 66 उपकेंद्र, 562 अंगणवाडी केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका व मदतनीस असे एक हजार 788 अधिकारी व कर्मचारी तसेच खासगी डॉक्‍टर व त्यांचे कर्मचारी तसेच एक हजार 720 अशा तीन हजार 508 जणांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. 

शासकीय व खासगी रुग्णालयात पाच हजार 171 रुग्णांनी उपचार घेतले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लस उपलब्ध होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three and a half thousand people will get corona vaccine at Sangamner