पारनेरमध्ये दुचाकी अपघातात पुण्याच्या तिघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 May 2020

पुण्यातील तीन तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नगरहून पुण्याकडे जात होते. सुप्याजवळ हरिदास पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगात जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. दुभाजक ओलांडून विरुद्ध रस्त्यावर फेकली गेली.

पारनेर : नगर-पुणे महामार्गावर सुप्याजवळील हरिदास पेट्रोलपंपासमोर दुभाजकावर दुचाकी आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली. त्यावेळी समोरून येणाऱ्या मालट्रकची दुचाकीस धडक बसून, दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मंगळवारी (ता. 26) रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा- पत्नीच्या डोक्‍यात पाटा घालून पतीची रेल्वेखाली आत्महत्या 

दुचाकीचालक वशीम सफीकउद्दीन मन्यार (खान) (वय 25 रा. पिंपरी गुरव, पुणे), मागे बसलेले अक्षय सुनील मकासरे (वय 25, रा. औंध, कस्तुरबावस्ती, पुणे) व अमित मोनिराम चव्हाण (वय 25, रा. पिंपरी गुरव, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. 

दुचाकीवरील नियंत्रण सुटले 

पुण्यातील वरील तीन तरुण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून मंगळवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नगरहून पुण्याकडे जात होते. सुप्याजवळ हरिदास पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगात जाताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली. दुभाजक ओलांडून विरुद्ध रस्त्यावर फेकली गेली. त्याच वेळी पुण्याहून नगरकडे येणाऱ्या मालट्रकची (एमएच 26 बीडी 5505) दुचाकीस जोरात धडक बसली. त्यात दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. 

दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा

याबाबत कानिफ पोपळघट (रा. सुपे) यांनी सुपे पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार सुपे पोलिसांनी दुचाकी चालक वाशिम याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुपे पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलिस करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three persons from Pune died in a two-wheeler accident in Parner