१५ दिवसात दुसरी घटना; राहुरीत हॉटेलची तोडफोड, तिघांना मारहाण

विलास कुलकर्णी
Friday, 9 October 2020

हॉटेलची चौघांनी तोडफोड केली, तसेच तिघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मागील 15 दिवसांत हॉटेलमधील प्राणघातक हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. 

राहुरी (अहमदनगर) : शहरातील हॉटेलची चौघांनी तोडफोड केली, तसेच तिघांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मागील 15 दिवसांत हॉटेलमधील प्राणघातक हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. 

याबाबत प्रवीण विलास कोळसे (रा. मानोरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. राहुल ऊर्फ पप्पू गंगाधर कल्हापुरे (रा. देसवंडी), दादा कुलट, किरण कुलट व अमोल कुलट (तिघेही रा. वळण), अशी आरोपींची नावे असून, सर्व आरोपी पसार झाले आहेत. या घटनेत निजाम पठाण, प्रमोद दसपुते व ऋषिकेश घोडके जखमी झाले असून, त्यांना नगरला हलविले आहे. 

नगर-मनमाड रस्त्यावरील "तोरणा' हॉटेलमध्ये मंगळवारी (ता. 6) रात्री साडेनऊ वाजता वरील चार आरोपी आले. "हे हॉटेल आम्हाला चालविण्यासाठी घ्यायचे होते, तुम्ही का घेतले..?' असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली. हॉटेलमधील तिघांना जिवे मारण्याची धमकी दिली. 

दरम्यान, चिंचोली येथे नगर-मनमाड रस्त्याच्या बाजूच्या एका हॉटेलमध्ये 15 दिवसांपूर्वी चौघांनी तरुणाला घातक शस्त्रांनी मारहाण केली होती. तशाच हल्ल्याची राहुरी शहरात पुनरावृत्ती घडली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three persons were beaten up after breaking into a hotel in Rahuri