
अहमदनगर : महामार्गावर कार उलटल्याने तिघे गंभीर जखमी
घारगाव - संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारातील कुऱ्हाडे वस्ती येथे कारचा भीषण अपघात झाला. त्यात तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (ता. १८) पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडला. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
अपघाताबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अभिजित शंकर लुगडे (रा. कासारवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), प्रसाद पद्माकर कलाल (रा. नवी मुंबई) व एक महिला (नाव समजू शकले नाही) असे तिघे कारमधून (एमएच. 12 यूसी. 2174) नाशिकला गेले होते. ते नाशिकहून काम आटोपून पुन्हा संगमनेरमार्गे पुणेच्या दिशेने जात होते. बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा शिवारातील माळवाडी येथील कुऱ्हाडे वस्ती येथे आले असता कारला अपघात झाला.
अपघातानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. काही वाहनचालकांसह नागरिकांनी जखमींना कारमधून बाहेर काढत आळेफाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलिस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, अरविंद गिरी, उमेश गव्हाणे, नंदकुमार बर्डे, पोलिस पाटील संजय जठार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना मदत केली. या रस्त्यावरील अपघातांत वाढ होत असून, ते रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
Web Title: Three Seriously Injured Car Overturned On Pune Nashik Highway Sangamner Taluka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..