
अनेक भागांमध्ये शेतीची कामे ठप्प झाली आहेत. रात्री-अपरात्री वस्तीवर राहणाऱ्यांनी संरक्षक जाळ्या, तार कंपाउंड करण्यास सुरवात केली आहे.
अमरापूर : बिबट्याच्या वावरामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत.
अनेक भागांमध्ये शेतीची कामे ठप्प झाली आहेत. रात्री-अपरात्री वस्तीवर राहणाऱ्यांनी संरक्षक जाळ्या, तार कंपाउंड करण्यास सुरवात केली आहे.
शेजारील पाथर्डी तालुक्यात तीन बालकांचा बळी घेत बिबट्याने रहिवासी भागात धुमाकूळ घातला. या भागाला लागूनच असलेल्या तालुक्यातील वाघोली, वडुले, दिंडेवाडी, आव्हाणे, ढोरजळगाव, अमरापूर, मळेगाव, सामनगाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे अनेक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.
बिबट्याचे समक्ष दर्शन झाल्याचेही अनेकांनी सांगितले. त्यामुळे या भागातील शेतकरी शेतात गटागटाने जातात. ऊस, तूर, ज्वारी, कपाशी, फळबागा उंच वाढल्याने लपण्यासाठी बिबट्याला नैसर्गिक आश्रय निर्माण झाला आहे. त्यातच रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी व कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावेच लागते. अशा स्थितीत महिला, लहान मुले प्रचंड दहशतीखाली आहेत.
पश्चिम भागात शेतकरी शेतात जायला धजावत नसल्याने, कामे मोठ्या प्रमाणात खोळंबली आहेत. वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या कुटुंबांनी पाळीव प्राणी, जनावरांसह स्वसंरक्षणासाठी वस्तीभोवती जाळ्या, तार कंपाउंड बनविण्यास सुरवात केली आहे.
रात्री-अपरात्री जागे राहत, फटाके वाजवून बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी वातावरणनिर्मिती केली जात आहे. वन विभागाने दक्षता घेऊन, बिबट्या आढळलेल्या भागात पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.