टोमॅटोवर "तिरंगा' आणि शेतकरी हवालदिल

शांताराम काळे
सोमवार, 18 मे 2020

टोमॅटोवरील या विषाणूमुळे टोमॅटोचा रंग बदलतो. कडकपणा जातो आणि फळ आपोआप खराब होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. झाडावर रोग की बियाणे खराब, याबाबत शंका असून कृषी विभागाने नमुने तपासणीसाठी बंगळूरला पाठविले आहेत. त्याचा अहवाल उद्या (मंगळवारी) येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्याची प्रतीक्षा आहे. 

अकोले : टोमॅटोवर नव्या तिरंगा विषाणूने हल्ला केल्याने तालुक्‍यात सुमारे एक हजार एकर क्षेत्रातील पीक खराब झाले आहे. त्यात सुमारे 60 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बियाणे कंपनी आणि कृषी विभाग यांचा समन्वय नसल्याने, तसेच कृषी विद्यापीठाने नमुने बंगलोरला पाठवून वेळकाढूपणा केल्याचा आरोप महेश नवले, विलास भांगरे यांच्यासह नुकसानग्रस्त दहा शेतकऱ्यांनी केला आहे.

टोमॅटोवरील या विषाणूमुळे टोमॅटोचा रंग बदलतो. कडकपणा जातो आणि फळ आपोआप खराब होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. झाडावर रोग की बियाणे खराब, याबाबत शंका असून कृषी विभागाने नमुने तपासणीसाठी बंगळूरला पाठविले आहेत. त्याचा अहवाल उद्या (मंगळवारी) येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना त्याची प्रतीक्षा आहे. 

tomato

अकोले तालुक्‍यातील महेश नवले, विलास भांगरे यांच्यासह सुमारे 400 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्यामुळे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. कोळसे यांच्या पथकाने तालुक्‍यात भेट देऊन टोमॅटोचे नमुने बंगळूरला पाठविले आहेत. 

"शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा' 

विलास भांगरे (तांभोळ) यांनी याबाबत सांगितले, की माझ्या शेतामध्ये सिजेंटा कंपनीचे '1057' आणि सेमिनिस कंपनीचे "आयुष्यमान' या दोन हायब्रीड वाणांची लागवड केली होती. दर वर्षीप्रमाणेच टोमॅटोचे पीक अतिशय सुंदर व निरोगी आले; परंतु टोमॅटो सुरू झाल्यानंतर फळावर वेगवेगळे डाग, तिरंगा, लूज पडणे या समस्या जाणवायला लागल्या. त्यानंतर मी कंपनी प्रतिनिधीशी संपर्क केला. कंपनी प्रतिनिधींनीही टोमॅटोचे नमुने बंगळूर येथील संशोधन प्रयोगशाळेकडे पाठवले.

आम्हाला कंपनी गोपनीयतेचे कारण सांगितले. तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केला. सामूहिक व वैयक्तिक निवेदने दिली. आमच्या तक्रारीची दखल घेऊन लॉकडाउन असतानाही शास्त्रज्ञांची टीम शेतामध्ये पाहणीसाठी आली. परंतु त्यांचेही रिपोर्ट आले नाहीत. कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क केल्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटोचे आणि बियाण्यांचे सॅम्पल बंगळूरला पाठवले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे नामवंत कृषी विद्यापीठ आहे. तेथे टोमॅटोच्या वाणांना परवानगी देताना ट्रायल घेतल्या जातात. मोठमोठे शास्त्रज्ञ असताना, पाहणी केल्यानंतरही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसतील, तर शेतकऱ्यांनी कोणाकडे न्याय मागायचा? यात कंपनी व अधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. महेश नवले यांनीही अशीच माहिती दिली. सरकारने संबंधित कंपनी व कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. 

दोन वेळा पाहणी

तालुक्‍यात टोमॅटो व्हायरसमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पावले उचलून महात्मा फुले कृषी विद्यापीठातील वैज्ञानिक दोन वेळा आणून शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन पाहणी केली. दुसऱ्या वेळी बियाणे, झाडाची फांदी, केमिकल, फळे याचे नमुने वातानुकूलित बॉक्‍समध्ये घेऊन कृषी आयुक्तांच्या परवानगीने मंगळवारी खास वाहनाने बंगळूरला पाठविले आहेत. 
- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, अकोले 

 

tomato

टोमॅटोबाबत अफवा थांबवाव्यात : किसान सभा

टोमॅटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून, तथ्यांची मोडतोड करून काही जण अफवा पसरवत आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, असे आवाहन किसान सभेतर्फे करण्यात आले आहे. 

वनस्पतीबाधक विषाणू व प्राणिबाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणाऱ्या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणे कायदेशीर गुन्हा आहे. संबंधितांनी ही बाब लक्षात घेऊन याबाबतच्या अफवा पसरवणे तातडीने थांबवावे, असे आवाहन किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी केले आहे.

टोमॅटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभागाने काम सुरू केले आहे. कृषी विभागाने त्याबाबतच्या निष्कर्षांची माहिती तातडीने सार्वत्रिक करून या पिकाच्या आजारावरील उपायांबाबत शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

tomato

केंद्रीय उद्यानविद्या आयुक्तांचे पत्र

दरम्यान, डॉ. नवले यांनी याबाबत केंद्र सरकारच्या कृषी सहकारिता व किसान कल्याण विभागातील उद्यानविद्या आयुक्त डॉ. बी. एन. एस. मूर्ती यांच्याशी संपर्क साधला. डॉ. मूर्ती यांनी याबाबत एका दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेल्या बातमीचे खंडन करत, संबंधित वाहिनीला ई-मेलद्वारे पाठविलेले पत्र डॉ. नवले यांनाही पाठविले. त्यात म्हटले आहे, "सध्या टोमॅटोवर नवा तिरंगा व्हायरस आला हे खरे आहे. त्याबाबत राष्ट्रीय पातळीवर संशोधनही सुरू आहे. मात्र, या व्हायरसने मानवी जीविताला धोका असल्याचे वृत्त धादांत खोटे आहे. आजपर्यंत कोणत्याही वनस्पतींवरील कोणत्याही व्हायरसची मानवाला बाधा झालेली नाही. सध्या कोरोनामुळे आधीच लोक तणावात असताना अशा चुकीच्या बातम्या पसरविणे चुकीचे आहे.' याबाबतचे वास्तव संबंधित वाहिनीने तातडीने प्रसारित करावे, असेही डॉ. मूर्ती यांनी सूचित केल्याचे त्यांच्या पत्रातून स्पष्ट होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiranga on tomato and farmers afraid