धर्मवीरगडामध्ये संभाजी महाराजांच्या शौर्यस्तंभाची शासकीय पूजेची परंपरा शंभूभक्ताविना औपचारिकपणे साजरी

Tradition of official worship of Sambhaji Maharaj's gallantry pillar in Dharmavirgad.jpg
Tradition of official worship of Sambhaji Maharaj's gallantry pillar in Dharmavirgad.jpg

श्रीगोंदे (अहमदनगर)  :  छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानदिनाचे स्मरण ठेवून पेडगाव येथील धर्मवीरगड किल्ल्यातील शौर्यस्थळी असलेल्या संभाजी महाराजांच्या स्मृतीस्तंभाची दरवर्षी होणारी शासकीय पूजा यावर्षी औपचारिकपणे केवळ शासकीय अधिका-यांच्या उपस्थितीत बलिदानदिनाच्या पूर्वसंध्येला पार पडली. युवकांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणा-या या शौर्यस्तंभाची पूजा करुन हजारो युवक दरवर्षी शक्तीज्योत घेऊन वढू  तुळापूरला राजांच्या समाधीस्थळी जात असतात.

यावर्षी महाराष्ट्रात कोरोना रोगाचा संसर्ग वाढलेला असल्याने आणि प्रशासनाने अनेक निर्बंध घातलेले असल्याने पेडगावच्या किल्ल्यात श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांच्या हस्ते किल्ल्यातील शौर्यस्तंभाची शासकीय मानाची पूजा पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, प्रांताधिकारी स्वाती दाभाडे उपस्थित होत्या. पेडगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच सुलोचना भगवान कणसे आणि पंचायत समितीच्या माजी उपसभापती प्रतिभा झिटे या पूजेस उपस्थित होत्या. 

या तालुक्यातील शहीद लष्करी जवानांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. या ठिकाणी शासकीय पूजनात प्रज्वलित केलेली मशाल  प्रतिकात्मकपणे युवकांचे हस्ते छत्रपती शंभूराजांच्या वढू तुळापूर येथील समाधीस्थळी दौडत नेण्याऐवजी वाहनाने नेऊन तेथे विसर्जित करण्यात आली. किल्ल्यात पार पडलेल्या या औपचारिक शासकीय पूजनास आलेल्या अधिकारी वर्गास या ऐतिहासिक स्थळाचे महात्म्य प्रा. डॉ. नारायण गवळी यांनी सांगत याठिकाणी होणाऱ्या विकास आराखड्याची माहिती दिली. पूजनास आलेल्या प्रांताधिकारी दाभाडे यांनी स्फूर्तीस्थळी होणाऱ्या विकासकामास प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल, असे मनोगत व्यक्त केले. 

यावेळी पुण्याच्या शिवदूर्ग संवर्धन समितीचे अध्यक्ष विजय राजेभोसले व रविंद्र महाराज सुद्रिक प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर ही पूजा सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन करण्यात आली. सोशल डिस्टंन्सींग, मास्क व सँनिटायझरचा वापर आणि गर्दी टाळून शासकीय पूजेची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. दरवर्षी हजारो युवकांनी गजबजून जाणारे किल्ल्यातील दृष्य यावेळी सुने-सुने वाटत होते.

पेडगाव येथील छ.संभाजी महाराजांच्या शौर्यस्थळी झालेल्या शासकीय पूजनाप्रमाणेच छत्रपती शंभूराजांच्या बलिदानदिनी तुळापूर येथील बलिदानस्थळी व वढू येथील समाधीस्थळी अल्पश: उपस्थितीत औपचारिकपणे केवळ शासकीय पूजन होणार आहे. याठिकाणी दरवर्षी होणारे बाकी कसलेही कार्यक्रम होणार नाहीत व ही स्थळे दर्शनासाठी बंद राहतील असे प्रशासनाने कळवलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com